एडिंबर्गच्या विद्यापीठाचे संशोधन
‘ड’ जीवनसत्त्वाच्या गोळ्या घेतल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो असा वैज्ञानिकांचा दावा आहे. ‘ड’ जीवनसत्त्व हे जीवनसत्त्व व संप्रेरक दोन्ही असून त्यामुळे कॅल्शियम व फॉस्फेटचे रक्तातील प्रमाण नियंत्रित होते. हाडे व दातांसाठी ते आवश्यक असते.
‘ड’ जीवनसत्त्व तेलयुक्त मासे व अंडी यांत असते, नुसत्या जेवणातून ते पुरेसे मिळत नाही. त्वचा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यास ‘ड’ जीवनसत्त्व त्वचेखाली तयार होते. आतापर्यंतच्या अभ्यासानुसार ‘ड’ जीवनसत्त्व ११ बिटा एचएसडी १ हे वितंचक रोखते, असे मानले जात होते. हे वितंचक ताण निर्माण करणाऱ्या कॉर्टिसॉलची निर्मिती करत असते. कॉर्टिसॉलचे प्रमाण वाढले तर रक्तदाब वाढतो व धमन्या अवरुद्ध होतात. रक्तवाहिन्या आकुंचन पावतात तसेच मूत्रपिंडात पाणी साठले जाते. ‘ड’ जीवनसत्त्व कॉर्टिसॉलचे प्रमाण कमी करते, त्यामुळे व्यायामाचा फायदाही जास्त मिळतो तसेच हृदयविकाराचा धोका कमी होतो. एडिंबर्ग येथील क्वीन्स मार्गारेट विद्यापीठाने तेरा प्रौढ व्यक्तींना रोज ५० मायक्रोग्रॅम ‘ड’ जीवनसत्त्व देऊन दोन आठवडे निरीक्षण केले असता त्यांच्यात रक्तदाब कमी झालेला दिसला, तसेच कॉर्टिसॉलचे मूत्रातील प्रमाण कमी झालेले दिसले. हे लोक २० मिनिटांत साडेसहा किलोमीटर सायकलिंग करू शकत होते, तर दुसरा गट केवळ ५ किलोमीटर सायकलिंग करू शकला. ‘ड’ जीवनसत्त्वामुळे शारीरिक ताणही कमी झाला.
डॉ. राक्वेल रिव्हेल्टा इनिस्टा यांनी सांगितले की, ‘ड’ जीवनसत्त्वाच्या पुरवठय़ाने तंदुरुस्ती वाढते व हृदयविकार तसेच रक्तदाबाचा धोका कमी होतो. यावर आणखी वैद्यकीय चाचण्या करण्याची गरज असून सायकलस्वार व अॅथलीट यांना ‘ड’ जीवनसत्त्वाचा फायदा होऊ शकतो.