विवोने आपल्या S1 Pro या स्मार्टफोनच्या किंमतीत पुन्हा एकदा कपात केली आहे. कंपनीनं या फोनच्या किंमतीत एक हजार रुपयांची कपात केली आहे. आता या फोनची किंमत १९ हजार ९९० रुपये झाली आहे. याआधी या फोनची किंमत २० हजार ९९० रुपये होती. हा फोन जानेवारी महिन्यात भारतीय बाजारात लाँच करण्यात आला होता.

या आधी मार्च महिन्यात या फोनची किंमत १८ हजार ९९० रुपये करण्यात आली होती. एप्रिलमध्ये जीएसटी वाढवल्यानंतर या फोनच्या किंमतीत वाढ केली होती. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही ई कॉमर्स संकेतस्थळांवरुन Vivo S1 Pro ची विक्री होते. हा स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आणि 4,500 एमएएच क्षमतेच्या मोठ्या बॅटरीसाठी ओळखला जातो.

फीचर्स –
Vivo S1 Pro मध्ये 6.38 इंच सुपर एमोलेड डिस्प्ले असून इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनिंग फीचरही आहे. मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे, त्यात 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आहे. तर अन्य दोन मेगापिक्सलचे दोन सेन्सर आहेत. त्यातील एक डेप्थ सेन्सिंग आणि एक मॅक्रो फोटोग्राफीसाठी आहे. याशिवाय सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर असलेला हा फोन केवळ 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 9.0 वर आधारित FunTouch OS 9.2 कार्यरत असून फोनमध्ये 4,500 mAh क्षमतेची फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरी आहे.