नुकतेच सर्व कंपन्यांनी आपल्या टॅरिफमध्ये बदल केले होते. तसंच रिलायन्स जिओने आपले टॅरिफ प्लॅन्स वाढवण्याची घोषणा केल्यानंतर अन्य कंपन्यांनीही आपल्या टॅरिफ प्लॅन्समध्ये ४० ते ४५ टक्क्यांपर्यंतची वाढ केली होती. अशातच सर्व कंपन्यांनी केवळ आपल्या नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल देण्याचा निर्णय घेतला होता. तसंच अन्य मोबाईल नेटवर्कसाठी फेअर युसेज पॉलिसी लागू करण्यात आली होती. ग्राहकांची नाराजी लक्षात घेता एअरटेल पाठोपाठ आता व्होडाफोन-आयडियानंही कॉलिंगवरील फेअर युसेज पॉलिसी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनलिमिटेड प्लॅनच्या किंमती वाढवल्यानंतर सर्व मोबाईल कंपन्यांकडून कॉलिंगसाठी फेअर युसेज पॉलिसी लागू करण्यात आली होती. परंतु अनेक ग्राहकांनी यावर नाराजी व्यक्त करत या निर्णयाचा विरोध केला होता. यानंतर पहिल्यांदा एअरटेलनं ट्विट करत पुन्हा अनलिमिटेड कॉलिंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता व्होडाफोन आयडियानंही अनलिमिटेड कॉलिंग सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीनं ट्विट करून याद्वारे माहिती दिली आहे.

कंपनीनं टॅरिफमध्ये बदल केल्यानंतर २८ दिवसांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी १ हजार मिनिटे देण्यात आली होती. तर ८४ दिवसांच्या प्लॅनसाठी अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ३ हजार मिनिटे दिली होती. महिन्याच्या रिचार्ज करणाऱ्या व्यक्तीनं दिवसाला एक तास कॉलिंग केल्यास तो प्लॅन १६ दिवसांमध्ये संपला असता. त्यामुळे हे प्लॅन ग्राहकांच्या दृष्टीनं महाग झाले होते. परंतु आता कंपन्यांनी फेअर युसेज पॉलिसी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. फ्री म्हणजे फ्री. आमच्या ट्रू अनलिमिटेज प्लॅन्सच्या मदतीनं कोणत्याही मोबाईल नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलचा आनंद लुटा असं ट्विट व्होडाफोन आयडियाकडून करण्यात आलं आहे.