रिलायन्स जिओ आणि त्याबरोबरच बाजारात सुरु असलेल्या स्पर्धेत आपला टिकाव लागावा यासाठी टेलिकॉम कंपन्या एकाहून एक ऑफर्स जाहीर करत आहेत. नुकताच व्होडाफोननेही आपला नवा प्लॅन लाँच केला असून यामध्ये युजर्सला जास्तीत जास्त डेटा मिळणार आहे. ३४९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजरला १.५ जीबी इतका ३ जी आणि ४ जी स्पीडने मिळणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये युजरला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे व्होडाफोनच्या ग्राहकांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. हा प्लॅन २८ दिवसांसाठी लागू असणार आहे. आधी याच प्लॅनमध्ये ग्राहकांना १ जीबी डेटा देण्यात येत होता.

या प्रीपेड प्लॅनमध्ये युजरला रोमिंगही मोफत देण्यात आलेले आहे. अनलिमिटेड कॉलिंग मोफत असे कंपनीने सांगितले असले तरीही रोज २५० मिनिटे आणि आठवड्याला १ हजार मिनिटे मोफत मिळणार आहेत. व्होडाफोनचा हा प्लॅन एअरटेलच्या प्लॅनला टक्कर देणार असून काही दिवसांपूर्वी एअरटेलनेही अशाचप्रकारचा प्लॅन आपल्या ग्राहकांसाठी जाहीर केला होता. एअरटेलच्या प्लॅनमध्येही १.५ जीबी इंटरनेट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मेसेजेस देण्यात आले होते.

रिलायन्स जिओने टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अनेक नामांकित कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या कंपन्या आपल्या विविध ऑफर्स जाहीर करत आहेत. या महिन्यात एअरटेलने तिसऱ्यांदा बाजारात नवीन प्लॅन जाहीर केला आहे. याआधी कंपनीने ४५८ आणि ५०९ रुपयांचे प्लॅन जाहीर करत आपल्या ग्राहकांना खूश केले होते. मात्र आताचा प्लॅन त्याहून कमी किंमतीचा असल्याने तो ग्राहकांसाठी जास्त फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.