जिओने बाजारात दमदार प्रवेश केल्यानंतर एअरटेल, आयडीया आणि व्होडाफोनसारख्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे या कंपन्या काही ना काही निमित्त काढून आपल्या आकर्षक ऑफर्स काढताना दिसतात. दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने व्होडाफोनने नुकताच एक आकर्षक प्लॅन जाहीर केला आहे. जे लोक इंटरनेटपेक्षा कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी फोनचा जास्त वापर करतात त्या ग्राहकांसाठी कंपनीने नवीन प्लॅन लाँच केला आहे. प्रीपेड ग्राहकांसाठी कंपनीने ९९ आणि १०९ रुपयांचे दोन खास प्लॅन्स आणले आहेत. दोन्हीही प्लॅनची व्हॅलिडीटी २८ दिवसांची आहे. १०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग मिळणार आहे. तसेच यामध्ये ग्राहकांना १ जीबी इंटरनेट डेटाही मिळणार आहे. तसेच यामध्ये अनलिमिटेड मेसेजची सुविधाही मिळणार आहे. हा प्लॅन बीएसएनएल आणि एअरटेलच्या ९९ रुपयांचा प्लॅनला टक्कर देणार आहे.

तर ९९ रुपयांच्या प्लॅनमध्येही व्होडाफोन ग्राहकांना लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग मोफत मिळणार आहे. आता लवकरच आयडीया आणि व्होडाफोन एकत्र झाल्यानंतर आयडीयाही आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी अशाचप्रकारचे प्लॅन जाहीर करेल असे म्हटले जात आहे. याआधीही इंटरनेटसाठी कंपनीने आकर्षक प्लॅन जाहीर केले होते. यामध्ये काही दिवसांपूर्वीच एक आकर्षक प्लॅन जाहीर करण्यात आला होता. हा प्लॅन ५९७ रुपयांचा होता. त्याची वैधता १६८ दिवसांची असल्याचे कंपनीने जाहीर केले होती. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग, रोज १०० मोफत मेसेज तसेच १० जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनमधील विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचा मोबाईल वापरता त्यावर या प्लॅनची वैधता बदलणार आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी या प्लॅनची वैधता ११२ दिवस असून फिचर फोन वापरणाऱ्यांसाठी ती १६८ दिवस आहे.