टेलिकॉम क्षेत्रातील स्पर्धा दिवसेंदिवस वाढतेय. निरनिराळ्या प्लॅन्सद्वारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा टेलिकॉम कंपन्यांचा प्रयत्न आहे. याच स्पर्धेत आता Vodafone ने 269 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आणला आहे. एका महिन्यापेक्षा अधिक वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये डेटा, फ्री कॉलिंगसह अनेक अतिरिक्त फायदे मिळतील. जाणून घेऊया व्होडाफोनच्या या नव्या प्लॅनबाबत –

व्होडाफोनच्या 269 रुपयांच्या प्लॅनमध्ये 600 फ्री एसएमएस आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळेल.  56 दिवस वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये एकूण 4जीबी डेटाही मिळेल. याशिवाय 499 रुपयांचे व्होडाफोन प्ले आणि 999 रुपयांच्या ZEE5 चं फ्री सब्सक्रिप्शन मिळते. मात्र,  हा प्लॅन निवडक सर्कलमध्येच उपलब्ध आहे. व्होडाफोनच्या सेल्फ केअर अॅपवर या प्लॅनच्या उपलब्धततेबाबत माहिती मिळवू शकतात.

व्होडाफोन, एअरटेलच्या तुलनेत जिओचा 329 रुपयांचा प्लॅन :
व्होडाफोनचा हा प्लॅन ५६ दिवसांची वैधता असलेल्या इतर कंपन्यांच्या प्लॅनपेक्षा बराच स्वस्त आहे. 300 रुपयांपेक्षा कमीमध्ये इतकी अधिक वैधता एअरटेल किंवा रिलायंस जिओकडेही नाही. येत्या काही दिवसांमध्ये व्होडोफोनला टक्कर देण्यासाठी एअरटेलकडून अशाप्रकारचा प्लॅन आणला जाण्याची शक्यता आहे. तर जिओच्या 329 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवस वैधता असून जिओने हा प्लॅन व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलच्या 379 रुपयांच्या प्लॅनला उत्तर म्हणून सादर केला होता.

व्होडाफोन आणि एअरटेलचा 379 रुपयांचा प्लॅन :
84 दिवसांच्या वैधतेसह असलेल्या व्होडाफोनच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह 1000 फ्री एसएमएस, एकूण 6जीबी डेटा आणि युजर्सना ZEE5 आणि व्होडाफोन प्लेचं फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. तर, एअरटेलच्या 379 रुपयांच्या प्लॅनमध्ये व्होडाफोनप्रमाणे 84 दिवस वैधतेसह 6जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, 1000 फ्री एसएमएस मिळतील. दुसरीकडे जिओच्या 329 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवस वैधतेसह 1000 नॉन-जिओ मिनिट्स मिळतात.