रिलायन्स जिओ बाजारात आल्यापासून अनेक स्पर्धक कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. इंटरनेटची सुविधा दिल्यानंतर कंपनीने आपला फोन बाजारात आणत कंपनीने ग्राहकांना आकर्षित केले होते. काही दिवसांपुर्वीच कंपनीने गिगाफायबर लाँच केले होते. त्याची मार्केटमध्ये जोरदार चर्चाही झाली होती. मात्र आता जिओच्या गिगाफायबरला टक्कर देण्यासाठी स्पर्धक कंपन्यांनी कंबर कसली आहे. व्होडाफोनची मालकी असलेल्या यू ब्रॉडबॅण्डने आपल्या ग्राहकांना एक खास ऑफर दिली आहे.

कंपनीने आपल्या ग्राहकांना ४ महिन्यासाठी डेटा फ्री देण्याची घोषणा केली आहे. मात्र यासाठी यू ब्रॉडबॅण्डच्या सध्याच्या ग्राहकांना त्यांचा प्लॅन १२ महिन्यांसाठी अपग्रेड करावा लागणार आहे. म्हणजेच १२ महिन्यांच्या पैशात ग्राहकांना १६ महिन्यांचा डेटा वापरायला मिळणार आहे. या रिचार्जचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून रिचार्ज करावे लागणार आहे. यू ब्रॉडबॅण्डचा एक महिन्याचा प्लॅन ३ महिन्यांसाठी अपग्रेड केलात तर १ महिना फ्री डेटा मिळेल. तर ६ महिन्यांसाठी अपग्रेड केल्यावर २ महिने आणि वर्षभरासाठी अपग्रेड केल्यावर ४ महिने डेटा फ्री मिळणार आहे. रिचार्ज करताना ग्राहकांना UPGRADE33 हा कोड वापरावा लागणार आहे.

गिगाफायबरची सुविधा कंपनीने टप्प्याटप्प्याने सर्व शहरात सुरु केली होती. जुलैमध्ये कंपनीने आपण ही सेवा देणार असल्याचे आपल्या सर्वसाधारण सभेत जाहीर केले होते. त्यानंतर स्पर्धक कंपन्यांचे धाबे दणाणले होते. ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञानावर आधारीत या सेवेमुळे ब्रॉडबँडच्या क्षेत्रामध्ये केवळ क्रांतीच होणार नाही तर आत्तापेक्षा कमी दरात वेगवान इंटरनेट सेवा मिळणार असल्याची चर्चा रंगली होती.