बापू बैलकर

डिसेंबर महिन्यात २ लाख ७१ हजार २४९ प्रवासी वाहनांच्या विक्रीची नोंद झाल्याचे ‘फाडा’ने ( द फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशन) जाहीर केले असून गेल्यावर्षीच्या तुलनेते २३.९९ टक्के वाढ झाली आहे. ही अनपेक्षित मागणी वाढल्याने कार उत्पादक कंपन्यांना वेळेवर पुरवठा करणे अशक्य होत असल्याने दोन ते आठ महिन्यांपर्यंत कारचा प्रतीक्षा कालावधी वाढला आहे.

करोनानंतर वाहन उद्यागोला उभारी मिळाली असून सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी खरेदीदारांनी स्वत:चे वाहन खरेदीवर भर दिला आहे. त्यामुळे टाळेबंदी शिथिलीकरणानंतर वाहनांची विक्री वाढली आहे. यात प्रवासी वाहने, दुचाकी व टॅक्टरचा समावेश आहे. वाहन विक्रीचा हा चढता आलेख ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्यांपासून कायम राहिला असून जानेवारीत यात मोठी वाढ अपेक्षीत आहे. यामुळे सध्या नवीन कारची प्रतीक्षा ही दोन ते आठ महिने लांबणीवर पडली आहे. या काळात ‘एसयूव्ही’ कारला मोठी मागणी राहिली असली तरी हॅचबॅक आणि सेदान प्रकारातील कारला वाहन खरेदीदारांनाही मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

गेली दिड वर्षे वाहनउद्योग आर्थिक मंदीतून जात होता. त्याचा मोठा परिणाम हा वाहनविक्रीवर झाला होता. परिणामी वाहन उत्पादक कंपन्यांनी मनुष्यबळ कपातीसह उत्पादनही कमी केले होते. त्यात मार्चनंतर करोनाचे संकट निर्माण झाले. त्यानंतर टाळेबंदी लागू केल्यानंतर काही महिने वाहन उत्पादनाचे काम ठप्पच झाले होते. मागणी कमी असल्याने अनेक आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांनी मनुष्यबळ कपात करीत उत्पादनही कमी केले होते. यानंतर शिथिलीकरणानंतर निर्बंधासह काम सुरू होत वाहनांची मागणी वाढू लागली. ऑक्टोबरपासून या मागणीत वाढ होत गेली. गेली तीन महिने वाहन खरेदीला खरेदीदारांनी मोठी पसंती दिल्याने मागणी वाढली आहे. २०२० या आर्थिक वर्षांच्या तिमाहीत वाहनउद्योगाला मोठी उभारी मिळाली असून हा उद्योग पूर्वपदावर येत गेल्या वर्षीच्या डिसेंबरच्या तुलनेत वाहनविक्री ११.०१ टक्के वाढली आहे. १८ लाख ४४ हजार १४३ वाहनविक्रीची नोंद झाल्याचे ‘फाडा’ने जाहीर केले आहे. या सर्वाधिक विक्री ही टॅक्टरची ३५.४९ टक्के झाली असून त्यानंतर प्रवासी वाहनांची विक्री ही २३.९९ झाली आहे. दुचाकी खरेदीला पसंती असून ११.८८ टक्के गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे.

वाहनविक्रीत वाढ झाल्याने वाहनउत्पादक कंपन्याकडून त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने सध्या नवीन वाहन खरेदीदारांना वाहन ताब्यात मिळण्यासाठी प्रतीक्षेत राहावे लागत आहे. काही कारची प्रतीक्षा तर अगदी आठ महिन्यांपर्यंत गेली आहे.

वाहनविक्रीत आघाडीच्या कंपनी मारुतीच्या स्विफ्ट, ऑल्टो आणि वॅगनआर या कारची प्रतीक्षा यादी ३ ते ४ आठवडय़ांची असून अर्टिगासाठी तर ६ ते आठ महिने वाट पाहावी लागत आहे. डिसेंबर महिन्यात मारुतीच्या १ लाख ३० हजार ७७२ कार विकल्या गेल्या आहेत. एकूण वाहनविक्रीत त्यांचा ४८.२१ टक्के वाटा आहे. कपनीने आपली उत्पादन क्षमतेचा शंभर टक्के वापर करूनही खरेदीदारांना प्रतीक्षा आहे.

ुंदाई कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या पत्रकानुसार डिसेंबर महिन्यात त्यांच्या ७१ हजार १७८ कारची नोंदणी झाली असून ऑल न्यू क्रेटा व व्हेन्यू या ‘एसयूव्हीं’ना सर्वाधिक मागणी राहीली आहे. नुकतीच बाजारात नव्या रूपात आलेल्या ‘आय २०’ कारलाही मोठी मागणी आहे. क्रेेटाची प्रतिक्षा ही सहा महिन्यापर्यंत गेली होती. कंपनीने क्रेटाच्या उत्पादनात दुपटीने वाढ करीत हा कालावधी कमी केला असून आता दोन ते तीन महिनांची प्रतीक्षा आहे. ‘फाडा’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ुंदाईच्या ४६ हजार ३३८ वाहनांची विक्रीची नोंद झाली आहे.

‘किआ’च्या सेल्टोस आणि नवीन आलेल्या ‘सोनट’ या कारलाही दोन ते तीन महिन्यांची प्रतीक्षा आहे, तर नुकत्याच बाजारात पदार्पण केलेल्या महिंद्रा आणि महिंद्राच्या थार या एसयूव्हीला सर्वाधिक आठ महिन्यांपर्यंतची प्रतीक्षा आहे.

निस्सान मॅग्नाईट २ डिसेंबर २०२० रोजी सादर झाल्यापासून ३२, ८०० हून अधिक नोंदणी झाली असून  १ लाख ८० हजार ग्राहकांनी विचारणा केली आहे. या कारची प्रतीक्षा सहा महिन्यांपर्यंत गेली आहे. त्यामुळे गाडी मिळण्याचा कालावधी दोन ते तीन महिन्यांपर्यंत कमी करता यावा, यासाठी कारखान्यातील उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने १००० हून अधिक मनुष्यबळाची भरती करून कारखान्यात तिसऱ्या पाळीतील काम सुरू करण्यात आले आहे. कंपनीच्या विक्री दालनातही अतिरिक्त मनुष्यबळ घेतले जात आहे. सर्व श्रेणींसाठीचा प्रतीक्षा कालावधी कमी व्हावा, यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे निस्सान मोटर कंपनीची मुख कार्यकारी अधिकारी अश्विनी गुप्ता यांनी सांगितले. निस्सान मोटर इंडियाचे अध्यक्ष सिनान ओझकोक यांनीही  ‘दोन ते तीन महिने असा कमी प्रतीक्षा कालावधी देत ग्राहकसमाधान वृद्धिंगत करणे हा आमचा प्रयत्न राहील असे सांगितले आहे.

डिसेंबर महिन्यात गेल्या दशाकातील या वर्षीची सर्वाधिक विक्री झाली असल्याने खरदेदीदारांच्या अपेक्षा पूर्ण करताना कार उत्पादक कंपन्यांना त्यांच्या कारखान्यांची उत्पादन क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दुप्पट क्षमतेने उत्पादन सुरू केले असून मनुष्यबळही वाढविण्यात आल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याने ग्राहकांना मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. आणखी काही दिवस ग्राहकांना ही प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र आंम्ही उत्पादन क्षमतेत मोठी वाढ करीत असून लवकरच हा प्रतीक्षा कालावधी कमी करीत ग्राहकसमाधान वृद्धिंगत करू असा विश््वास कार उत्पादक कंपन्यांनी व्यक्त केला आहे.

प्रतीक्षा कालावधी

* थार : ५ ते ८ महिने

* मॅग्नाईट : ५ ते ६ महिने

* अर्टिगा : ४ ते ६ महिने

* स्विफ्ट : ३ ते ४ महिने

* ऑल्टो :  ३ ते ४ महिने

* वॅगनआर :  ३ ते ४ महिने

* केट्रा   :  २ ते ३ महिने

* न्यू आय २० : २ ते ३ महिने

डिसेंबरमधील प्रमुख कार उत्पादक कंपन्यांची प्रत्यक्ष विक्री

(फाडाच्या आकडेवारीनुसार)

* मारुती : १,३०,७२२

* हुंदाई : ४६, ३८२

* टाटा : १९,६६९

* किआ : १७,९१३

* महिंद्रा आणि महिंद्रा १५,७७३

* होंडा : ९,४४१

* रेनॉल्ट : ९,००२

* टोयटा : ७,५५२

* फोर्ड : ४,८२१

* एमजी मोटर्स : ३०५७

* स्कॉडा : २, १४०