बोस्टन विद्यापीठाचे संशोधन
चालणे किंवा हळूहळू पळण्याच्या व्यायामाने वृद्धांच्या स्मरणशक्ती-कौशल्यांमध्ये सुधारणा होते, असे संशोधनात दिसून आले आहे. शारीरिक हालचाली, स्मृती व बोधनक्षमता याबाबत तरुण व वृद्धांमध्ये प्रयोग करण्यात आले.
बोस्टन विद्यापीठातील संशोधकांनी १८-३१, ५५ ते ८२ या वयोगटातील अनुक्रमे २९ व ३१ व्यक्तींचा अभ्यास केला त्यात अ‍ॅक्टिग्राफ या उपकरणाने त्या व्यक्तीने किती पावले टाकली याची नोंद घेण्यात आली. किती वेगाने ती व्यक्ती चालत होती त्यासाठी कि ती वेळ लागला याचीही नोंद घेण्यात आली. सहभागी व्यक्तींची न्यूरोसायकॉलॉजिकल चाचणी करून स्मृती, नियोजन व प्रश्न सोडवण्याच्या क्षमता यांची क्षमता तपासण्यात आली. दीर्घकालीन स्मृती, चेहऱ्यावरून नाव ओळखणे या निकषांच्या आधारे त्यांची परीक्षा घेण्यात आली. एखाद्या व्यक्तीने किती पावले टाकली व त्याचा स्मृतीवर काय परिणाम झाला याची नोंद घेण्यात आली. वृद्ध व्यक्ती जितकी जास्त चालली तितके नावे आठवण्याची क्षमता वाढलेली दिसली.
तरुण गटातील लोकांमध्ये तसे काहीच आढळले नाही. शारीरिक हालचालींमुळे दीर्घकालीन स्मृती वाढते असा निष्कर्ष यातून काढण्यात आला. अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंशाच्या आजारात वार्धक्याने मेंदूची होणारी हानी ही स्मृती नष्ट करीत असते पण शारीरिक हालचालींनी स्मृतीत फरक पडतो असे बोस्टन स्कूल ऑफ मेडिसीनचे स्कॉट हेस यांचे मत आहे.
चालण्याने लठ्ठपणा कमी होतो, हृदयविकारावरही काही प्रमाणात मात करता येते, शारीरिक हालचाली नसतील तर स्मृतीवर वाईट परिणाम होतो. चालणे, जिने चढणे यांसारखे व्यायामही यावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरतात पण यावर अधिक संशोधनाची गरज आहे.
शारीरिक हालचालींचा मेंदूच्या रचना व कार्यावर सकारात्मक परिणाम होतो व बोधनशक्तीही वाढते. यात एरोबिक व्यायामाचाही चांगला उपयोग होतो. आतापर्यंत प्रशनावलीच्या आधारे याबाबत संशोधन करण्यात आले होते, पण या वेळी प्रत्यक्ष प्रयोग करून तुलनात्मक संशोधन केले गेले आहे. इंटरनॅशनल न्यूरोफिजिकल सोसायटी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.