वाढत्या विकासाबरोबर आपण चालणेही विसरलो आहोत. जवळपासही कुठे जायचे असेल तरीही आपल्याला रिक्षा, टॅक्सी किंवा स्वत:चे वाहन लागते. चालणे टाळल्यामुळे अनेक विकारांचा सामना करावा लागत आहे. मात्र नव्या संशोधनानुसार दररोज चालण्याचा व्यायाम केल्याने हृदयाचे ५० टक्के विकार कमी होतात. ६५ पेक्षा अधिक वय असणाऱ्यांसाठी तर चालणे वरदानच आहे. अशा व्यक्तींनी दररोज चालले तर हृदयविकारांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण निम्म्याने घटू शकेल, असे हे संशोधन सांगते.

६५ वष्रे किंवा त्यापेक्षा अधिक वयोमान असणाऱ्या व्यक्तींना बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक व्याधी जडतात. जसे हृदयविकार, मधुमेह, पक्षघात, स्थुलता आदी. त्यासाठी त्यांच्या शरीराला चालना देणे आवश्यक आहे. जर चालण्याचा व्यायाम दररोज केला तर या विकारांचे निराकरण होऊ शकते. हृदयविकार तर चालण्यामुळे मोठय़ा प्रमाणात कमी होऊ शकतो.

‘युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी काँग्रेस’ने हे संशोधन केले आहे. संशोधकांनी ६५ ते ७४ या वयोगटातील २,४६५ पुरुष आणि महिलांवर हे संशोधन केले. या लोकांच्या शारीरिक कृतींवर लक्ष ठेवण्यात आले. जे लोक दररोज चालतात, त्यांच्यातील हृदयविकाराचा धोका टळलेला आढळल्याचे या संशोधकांनी सांगितले. दिवसातून किमान अर्धा ते एक तास चालणे गरजेचे आहे, असे या संशोधकांनी सांगितले.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)