आठवडय़ातील तीन दिवस केवळ ३० मिनिटे चालण्यामुळे कर्करोग पीडित रुग्णांच्या आयुष्यमान दर्जात सुधारणा होत असल्याची माहिती नव्या शास्त्रीय अभ्यासादरम्यान समोर आली आहे. सरे विद्यापीठ आणि किंग्ज महाविद्यालय लंडन येथील संशोधकांनी नियमित चालण्यामुळे कर्करोगग्रस्तांच्या आयुष्यमानावर सकारात्मक बदल होत असल्याचे अन्वेषण केले आहे.

नियमित व्यायामाने कर्करोग्यांना आरोग्य सुधारण्यास फायदे होत असल्याचे पुरावे समोर येत आहेत, परंतु कर्करोग जास्त बळावला असलेल्या रुग्णांमध्ये शारीरिक हालचालींचे प्रमाण अत्यंत कमी होते. या अभ्यासादरम्यान ४२ कर्करोगी रुग्णांना दोन गटांत विभागले गेले होते. पहिल्या गटातील रुग्णांना दिलेल्या प्रशिक्षणात त्यांना एक दिवसाआड तीस मिनिटांसाठी चालण्यास प्रवृत्त करण्यात आले. तर दुसऱ्या गटातील लोकांना दैनंदिन जीवनात कोणताही बदल न करण्यास सांगितले.

संशोधनाअंती पहिल्या गटातील लोकांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्यात सुधारणा दिसून आली. सहभागी झालेल्या रुग्णांनी नियमित चालल्यामुळे या आजाराविरुद्ध लढा देण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाल्याचे सांगितले.

नियमित व्यायामामुळे कर्करोग पुन्हा बळावण्यापासूनही थांबविले जाऊ शकते, त्याचप्रमाणे इतर गंभीर आजारांवर नियंत्रण ठेवता येते. असे सरे विदय़ापीठाच्या एमा रिअम यांनी सांगितले.

तीव्र आजारांनी ग्रासलेले लोक व्यायाम करण्यास टाळाटाळ करतात अशा वेळेस त्यांना प्रवृत्त करत, त्याच्या दैनंदिन जीवनात व्यायामाचा समावेश करणे फायदय़ाचे असल्याचे रिअम यांनी सांगितले.

या अभ्यासाचे अधिक  खात्रीलायक पुरावे मिळविण्यासाठी जास्त रुग्णांवर नियमित चालण्यामुळे होणाऱ्या शारीरिक , सामाजिक व भावनिक आरोग्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. असे किंग्ज विदय़ालयाच्या जो अम्र्स यांनी सांगितले. हा शास्त्रीय अभ्यास बीएमजे ओपन या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.