टाटा ग्रुप रिटेल क्षेत्रातील ऑनलाइन खरेदी-विक्रीसाठी ‘सुपर अ‍ॅप’ आणण्याच्या तयारीत आहे. या अ‍ॅपद्वारे टाटा ग्रुप रिटेल क्षेत्रात आपलं स्थान मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. या अ‍ॅपकरता निधी जमवण्यासाठी टाटा ग्रुपकडून गुंतवणूकीबाबात चर्चा सुरु आहे. या निधीच्या बदल्यात टाटा ग्रुप गुंतवणूकदारांना सुपर अ‍ॅपमध्ये भागीदारी देणार आहे. यासाठी अमेरिकेची दिग्गज होलसेल कंपनी वॉलमार्टशी बोलणी सुरु आहे.

टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, वॉलमार्ट टाटाच्या सुपर अ‍ॅपमध्ये २० ते २५ बिलियन डॉलर अर्थात सुमारे १.४ ते १.८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. वॉलमार्टने मे २०१८ मध्ये फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपनी ६६ टक्के हिस्सा खरेदी केला होता. तो व्यवहार १६ बिलियन डॉलरला झाला होता. जर टाटा ग्रुप आणि वॉलमार्टदरम्यान सुपर अ‍ॅपबाबत भागीदारी झाली तर हा रिटेल क्षेत्रातील देशातील सर्वात मोठा व्यवहार असेल.

संयुक्त रुपात लॉन्च होऊ शकतं ‘सुपर अ‍ॅप’

टाटा ग्रुप आणि वॉलमार्ट एका जॉईन्ट व्हेंचरच्या स्वरुपात संयुक्तरित्या सुपर अ‍ॅपला लॉन्च करु शकतात. यामुळे टाटा ग्रुप आणि फ्लिपकार्टच्या ई-कॉमर्स व्यवसायामध्ये वॉलमार्टला तालमेळ राखता येणार आहे. या भागादारीमुळे ग्राहकांना टाटा आणि फ्लिपकार्ट सर्व उत्पादनं एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील. सुत्रांच्या माहितीनुसार, वॉलमार्टने या व्यवहारासाठी गोल्डमॅन सैशेला इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून नियुक्त केलं आहे. सुपर अ‍ॅपची किंमत ५० ते ६० बिलियन डॉलर असू शकते.

इतर गुंतवणूकदारांशीही सुरु आहे चर्चा

ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, सुपर अ‍ॅपची भागीदारी विकण्यासाठी टाटा ग्रुप अन्य संभाव्य गुंतवणूकदारांशी देखील चर्चा करीत आहे. यामध्ये अनेक ग्लोबल टेक कंपन्यांचा समावेश आहे. मात्र, सध्या ही चर्चा प्रारंभिक टप्प्यात असून गुंतवणुकीबाबत अद्याप अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही.

डिसेंबरपर्यंत लॉन्च होऊ शकतं सुपर अ‍ॅप

टाटा ग्रुपचं हे सुपर अ‍ॅप डिसेंबरपर्यंत लॉन्च होऊ शकतं. देशातील वाढता ई-कॉमर्स उद्योग पाहता कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या अ‍ॅपवर खाण्या-पिण्याच्या वस्तूंसह फॅशन, लाईफस्टाईल आणि बिल पेमेंटची सुविधाही उपलब्ध असेल. याशिवाय टाटा ग्रुपचे ई-कॉमर्स व्यवहार टाटा क्लिक, स्टार क्विक आणि क्रोमाची उत्पादनंही या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील.