अक्रोडाचे सेवन करणाऱ्या लोकांमध्ये प्रकार-२ मधुमेह विकसित होण्याचा धोका कमी असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. अभ्यासात भाग घेतलेल्या लोक दिवसाला दीड चमचे एवढय़ा प्रमाणात अक्रोडचे सेवन करीत होते, असे अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले. या प्रमाणात दुपटीने वाढ केल्यास म्हणजे तीन चमचे एवढय़ा प्रमाणात अक्रोडचे सेवन केल्यास प्रकार-२चा मधुमेह विकसित होण्याचा धोका ४७ टक्क्यांनी कमी होत असल्याचे संशोधकांनी सांगितले. २८ गॅ्रम किंवा चार चमचे अक्रोडचे सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचे संशोधकांनी सांगितले.

हा अभ्यास डायबेटिस, मेटाबॉलिज्म, रिसर्च अ‍ॅण्ड रिव्हीव या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. संशोधकांनी यासाठी अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य आणि पोषण परीक्षा सर्वेक्षणमधील माहितीचे विश्लेषन केले.

या अभ्यासात १८ ते ८५ या वयोगटांतील ३४,१२१ लोकांना त्यांच्या आहाराविषयी विचारणा करण्यात आली होती. त्याचबरोबर त्यांना मधुमेह आहे का किंवा मधुमेहासाठी ते कोणते औषध घेत आहेत का याबाबत देखील विचारणा करण्यात आली. या अभ्यासामुळे आहाराबाबत योग्य मार्गदर्शनातून मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत होत असल्याचे पुरावे समोर आले आहेत, असे कॅलिफोर्निया विद्यापीठातील लेनोर अरब यांनी सांगितले.

जे लोक अक्रोडचे सेवन करत नाही त्यांच्या तुलनेत अक्रोडचे सेवन करणाऱ्यांना प्रकार-२ मधुमेहाचा धोका कमी असल्याचे आढळून आले. मधुमेहींना उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रेरॉल याचा त्रास होते असे आढळून आले असून यामुळे हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.