या नवीन वर्षात जर तुम्ही मलेशियाला फिरायला जाण्याचा प्लॅन करीत असाल आणि तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट असेल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. ज्या प्रकारे श्रीलंका सरकार भारतीयांसाठी आपले मोफत व्हिसाचे धोरण वाढवणार आहे. याच धर्तीवर मोफत व्हिसाद्वारे मलेशिया सरकारही भारतीय पर्यटकांसाठी आपले दरवाजे खुले करणार आहे.

नव्या वर्षात अर्थात संपूर्ण २०२० मध्ये भारत आणि चीनमधून येणाऱ्या पर्यटकांसाठी मलेशिया सरकार १५ दिवसांसाठी व्हिसा फ्री ट्रॅव्हल पॉलिसी घेऊन येत आहे. मलेशियन सरकारने नवीन पासपोर्ट ऑर्डरद्वारे याची घोषणा केली आहे. २६ डिसेंबर रोजी फेडरल गव्हर्नमेंट गॅझेटमध्ये हा आदेश छापून आला आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.

या नव्या आदेशानुसार, भारत आणि चीनचे नागरिक असलेल्या प्रवाशांना आवश्यक व्हिसाच्या प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे मलेशियाला फिरायला जाऊ इच्छिणाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल रजिस्ट्रेशन अॅण्ड इन्फॉर्मेशन (eNTRI) सिस्टिमवर नोंदणी करावी लागणार आहे.

प्रवाशाला स्वतः किंवा ट्रॅव्हल एजन्सीमार्फत भारतातील मलेशिअन मिशन ऑफिसमध्ये ही नोंदणी करता येणार आहे. १ जानेवारी २०२० पासून ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ही योजना लागू असणार आहे. एकदा ही नोंदणी झाली की पर्यटकांना तीन महिन्यांच्या आत कधीही पंधरा दिवसांसाठी मोफत व्हिसाच्या योजनेसह मलेशियाला पर्यटन करता येईल.

त्याचबरोबर मलेशिअन सरकारच्या या आदेशानुसार, भारतीय पर्यटकांनी एकदा या योजनेचा लाभ घेतल्यानंतर मलेशिया सोडल्यानंतर ते पुन्हा ४५ दिवसांनंतर या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र, मलेशियात येणाऱ्या पर्यटकांना भारतात किंवा इतर देशात परतण्याचे थेट विमानाचे तिकिटही त्याचवेळी काढणे आवश्यक आहे.