फळे खाणे हे आरोग्यासाठी चांगले असते. रोजच्या आहारात फळांचा समावेश असावा, असे डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ आपल्याला वारंवार सांगत असतात. शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असलेले अनेक घटक फळांमधून मिळतात. मात्र, शेतांमध्ये फळांचे कीड किंवा अन्य रोगांपासून रक्षण करण्यासाठी त्यावर कीटकनाशके फवारली जातात. द्राक्षे, पपई, सफरचंद यांसारख्या फळांवर तर आपल्या डोळ्यांनाही दिसून येतील इतक्या प्रमाणात कीटकनाशके फवारलेली असतात. हे विषारी घटक पोटात गेल्यास ते आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे कोणतेही फळ खाण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घेतले पाहिजे.
मात्र, काही फळांवरील कीटकनाशके केवळ पाण्याने पूर्णपणे धुतली जात नाहीत. त्यासाठी बेकिंग सोडा हा उत्तम पर्याय ठरू शकतो, अशी माहिती संशोधनातून पुढे आली आहे.

हे आहेत खजूर खाण्याचे फायदे

पाण्यामध्ये बेकींग सोडा मिसळून त्याने सफरचंद धुतल्यास त्यावरील कीटकनाशके निघून जाण्यास मदत होते. अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस विद्यापीठात याबाबत नुकतेच संशोधन करण्यात आले. त्यानुसार, किटकनाशकांमध्ये थायबेंडोझोल आणि फोसमेट या घटकांचा समावेश असतो. बेकींग सोड्याचा वापर केल्यास हे घटक निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे यापुढे कोणतेही फळ धुण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करून पाहा. जेणेकरून कीटकनाशके पोटात जाऊन तुमच्या आरोग्याला कोणताही अपाय होणार नाही.