News Flash

अ‍ॅपलच्या घडय़ाळात तब्येतीवरही नजर

ऑक्सीमीटर, हॅण्डवॉश टायमर, व्यायामाचे धडे

(संग्रहित छायाचित्र)

 

करोनामुळे प्रत्येकाच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या गोष्टींचा समावेश असलेले नवे ‘अ‍ॅपल ६’ हे मनगटी घडय़ाळ अ‍ॅपल या कंपनीने मंगळवारी एका कार्यक्रमातून जाहीर केले. रक्तातील ऑक्सीजन मोजण्याच्या सुविधेसह ‘हॅण्डवॉश’बाबत सूचना देणे, व्यायामाचे धडे देणे, हृदयाचे ठोके मोजणे आणि त्यासोबत कुटुंबातील इतर सदस्यांशी सदैव संपर्कात ठेवणारी वैशिष्टय़े या घडय़ाळात आहेत.

‘अ‍ॅपल ६’खेरीज ‘अ‍ॅपल एसई’ हे स्मार्ट वॉच, आयपॅड आठ आणि आयपॅड एअर यांचीही घोषणा कंपनीच्या ‘टाइम फ्लाइज’ या ऑनलाइन सोहळय़ातून करण्यात आली.

करोना काळात ऑक्सीमीटर, हृदयाची गती मोजणे आदी गोष्टी नित्यक्रमाचा भाग झाल्या आहेत. ही नस ओळखून अ‍ॅपलने आपल्या नव्या घडय़ाळात शारीरिक हालचालींची नोंद ठेवणाऱ्या अनेक गोष्टींचा समावेश केला आहे. यातील ऑक्सिमीटरसाठी संवेदक (सेन्सर) लावलेले असून चार रंगांचे एलईडी दिवे त्यात आहेत. लाल रंगाच्या प्रकाशलहरी किती प्रमाणात शोषल्या जातात यावरून शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ठरते. त्यानंतर अ‍ॅपल अलगॉरिदमच्या मदतीने शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कळते. याशिवाय यात हृदयाचे ठोकेही मोजले जाणार आहेत.

अ‍ॅपल वॉच ६ मालिकेत कोविडच्या दृष्टिकोनातून नवीन वैशिष्टय़ांचा समावेश केला आहे. त्यात हँडवॉशिंग टायमर, स्लीप ट्रॅकर यांचाही समावेश आहे.

फिटबिट ही कंपनी गूगलची ‘अल्फाबेट इनकार्पोरेशन’ विकत घेत असून त्यांच्या घडय़ाळातही ऑक्सिमीटर आहे. फिटबिटशी हे घडय़ाळ स्पर्धा करणार आहे.

अ‍ॅपल वॉच रोज १४ तास चालू शकते. त्यात फॅमिली सेट अप आहे. त्याची किंमत भारतात जीपीएससह ४० हजार ९९० रुपये, तर जीपीएस व सेल्युलरसह ४४ हजार ९९० रुपये इतकी असेल.

‘अ‍ॅपल’ची नवीन उत्पादने

* ‘अ‍ॅपल वॉच एसई’ हे भारतीयांना परवडणाऱ्या किमतीत असून त्याचा डिस्प्ले मोठा आहे. त्यात व्यायामशाळेतील साधनांशी सुसंसगती साधणारे काही संवेदक असून स्लीप अ‍ॅपही आहे. हँडवॉश म्हणजे हात धुण्याची आठवण करून देण्याची व्यवस्था आहे. याची किंमत जीपीएससह २९ हजार ९०० रुपये, तर जीपीएस व सेल्युलरसह ३३ हजार ९०० रुपये आहे.

* आयपॅड ८ ची नवी आवृत्ती आली असून त्यात ए १२ बायोनिक चिप आहे. यात मशीन लर्निगच्या पातळीवरचे तंत्रज्ञान असून सिरी, छायाचित्र संपादन, ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी, अ‍ॅपल पेन्सिल, एलटीई कनेक्टिव्हिटी, टच आयडी सपोर्ट ही वैशिष्टय़े आहेत. आयपॅड ८ ची किंमत वायफाय मॉडेलसाठी २९ हजार ९०० व वायफाय अधिक सेल्युलर मॉडेलसाठी ४१ हजार ९०० रुपये आहे. अ‍ॅपल पेन्सिलची स्वतंत्र किंमत ८ हजार ५०० रुपये असून स्मार्ट कीबोर्ड १३ हजार ९०० रुपयांना आहे. एकूण ३० भाषांचा समावेश त्यात आहे.

* आयपॅड एअरची नवी म्हणजे चौथी आवृत्ती सादर करण्यात आली असून त्यात ए १४ बायोनिक प्रोसेसर आहे. त्याची किंमत ५४ हजार ९०० ते ६६,९०० दरम्यान राहील. तो ६४ जीबी व २५६ जीबी पर्यायात असणार आहे.

* अ‍ॅपल वन सेवांमध्ये अ‍ॅपल म्युझिक, अ‍ॅपल टीव्ही, अ‍ॅपल आर्केड, अ‍ॅपल क्लाऊड यांचा समावेश आहे. तुलनेने त्याची किंमत कमी ठेवली आहे. ५० जीबी क्लाऊड स्टोरेजसह महिन्याला १९५ रुपये खर्च आहे.

* अ‍ॅपल फिटनेस ही सशुल्क सेवा असून त्यासाठी भारतातील लोकांना वाट पाहावी लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 12:15 am

Web Title: watch health on apple watch abn 97
Next Stories
1 ताक पिण्याचे ‘हे’ ८ महत्त्वाचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
2 Apple iPad Air, iPad 8 लाँच; पाहा काय आहे विशेष
3 Apple Watch Series 6 लाँच; ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर फिचरचाही समावेश
Just Now!
X