जास्त वेळ टीव्ही पाहण्याचे अनेक तोटे आहेत. त्यामुळे आरोग्यावरही परिणाम होतो. आता एका नवीन सर्वेक्षणानुसार असे आढळले आहे की, जास्तवेळ टीव्ही पाहण्यामुळे दुस-या प्रकारच्या मधुमेहाची शक्यता वाढते. तसेच त्यामुळे हृदय रोगाची शक्यताही अधिक प्रमाणात बळावते.
मधुमेह टाळण्यासाठी केवळ योग्य आहार आणि व्यायाम गरजेचा नाही तर टीव्ही पाहण्यावरही नियंत्रण असण्याची गरज आहे, असे हॉवर्ड स्कूलचे प्राध्यापक फ्रँक हू यांनी सांगितले आहे. या परीक्षणासाठी १९७० सालापासून प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांचाही अभ्यास करण्यात आला आहे. जगात सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण भारतात आढळतात. २००७साली करण्यात आलेल्या पाहणीनुसार भारतात जगामधील सर्वाधिक म्हणजे ५०.९ कोटी मधुमेहाचे रूग्ण आहेत. त्यानंतर चीनमध्ये ४३.२ कोटी, अमेरिकेत २६.८ कोटी, रशियात ९.६ कोटी, ब्राझीलमध्ये ७.६ कोटी, जर्मनीत ७.५ कोटी आणि पाकिस्तानमध्ये ७.१ कोटी तर इंडोनेशियात सात कोटी मधुमेहाचे रुग्ण आहेत.
आहारात तेल व मेद, शर्करायुक्त पदार्थांचे प्रमाण जास्त असल्यामुळेही मधुमेह होतो. त्यातून टीव्ही पाहण्याचे जास्त प्रमाण म्हणजे दुस-या प्रकारच्या मधुमेहाचे स्वागत करण्यासारखे आहे. त्यामुळे, टीव्ही पाहण्यावर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे आहे.