पिकांना सांडपाणी देण्यामुळे माणसाला रोग होऊ शकतात. त्यात गॅस्ट्रोचा व अतिसाराचा समावेश आहे. अनेकदा शेतकरी सांडपाण्यावर पिके वाढवतात, पण ते आरोग्यास धोकादायक असते, असे संशोधनात दिसून आले आहे.

ब्रिटनमधील बर्मिगहॅम विद्यापीठाने म्हटले आहे, की कालव्यातील सांडपाणी अनेकदा शेतीसाठी वापरले जाते हा प्रकार विशेष करून शहरी शेतीत होतो. बुर्किना फासो येथे हा प्रकार जास्त दिसून येतो. या पाण्यावर वाढलेल्या पिकांमध्ये रोगजंतूंचा समावेश असतो व त्यामुळे गॅस्ट्रो तसेच अतिसार होतो. कमी व मध्यम उत्पन्नाच्या देशात हे प्रकार जास्त होतात.

बुर्किना फासोची राजधानी क्वागडोगू येथे २२ लाख लोक राहतात. तेथे सांडपाण्यावर शेती केली जाते. या पाण्यात प्रतिजैविकांना विरोध करणारी जनुके असतात व असे सांडपाणी शहरी शेतीत वापरले जाते, त्यामुळे जीवाणूंचा प्रसार होऊन रोग होतात. सब सहारन आफ्रिकेत शहरी लोकसंख्या २०१० मध्ये ४० कोटी होती ती २०५० मध्ये १.२६ अब्ज होण्याची शक्यता संयुक्त राष्ट्रांनी वर्तवली आहे. सांडपाणी किंवा प्रदूषित पाणी शेतीला वापरणे हानिकारक असून, त्यामुळे रोगजंतू शरीरात प्रवेश करतात. परिणामी, आरोग्य बिघडते असे बर्मिगहॅम विद्यापीठाच्या लॉरा पिडॉक यांनी सांगितले.

जगात २० कोटी लोक शहरी शेती करतात. त्यातून  शहरातून असलेली भाज्यांची नव्वद टक्के मागणी पूर्ण केली जाते. मध्यम व कमी उत्पन्नाच्या देशात सांडपाणी व औद्योगिक प्रदूषित पाणी प्रक्रिया न करताच पर्यावरणात सोडले जाते. ते पाणी सहज मिळत असल्याने शेतीसाठी त्याचा वापर केला जातो.

माणूस व प्राणी यांना दिली जाणारी ५० ते ९० टक्के प्रतिजैविके ही विष्ठा व मूत्रातून बाहेर पडत असल्याने त्याचा समावेश पाण्यात असतो. कालव्याच्या पाण्यातही यात रोगजंतू सापडल्याची उदाहरणे आहेत. मध्यम उत्पन्न गटातील देशात दरवर्षी ८४२००० लोक अतिसाराने मरतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले असून हा अतिसार होण्यास अपुरे पाणी, सांडपाणी प्रक्रियेचा अभाव ही कारणे आहेत.