जेवणात भले आपण कितीही सकस पदार्थांचा समावेश करत असू पण, तरीही जेवणातून शरीरास अपायकारक घटक आपल्या पोटात जात असल्याची बाब समोर आली आहे. आपल्या प्रत्येक जेवणातून प्लास्टिकचे सुमारे १०० अत्यंत सुक्ष्म कण पोटात जात असल्याचं यूकेतील हेरॉयट-वॉट विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एका संशोधनांत सिद्ध केलं आहे. दर वीस मिनिटाला हे घटक अन्नातून किंवा श्वासावाटे आपल्या शरीरात जात असल्याचं या संशोधनातून म्हटलं आहे.

वाचा : सुक्या मेव्यातील प्रथिने हृदयासाठी उपयुक्त

यासाठी विद्यापीठातील चमूने काही घरातील जेवणाच्या ताटांचं निरिक्षण केलं. या ताटांवर त्यांना प्लॅस्टिकचे लहान कण आढळून आले. दर वीस मिनिटांनी जेवणाच्या ताटावर प्लॅस्टिकचे छोटे छोटे कण जमा होतात. त्याच ताटांतून आपण जेवतो. त्यातूनच हे प्लॅस्टिकचे लहान कण आपल्या पोटात जातात असं शास्त्रज्ञ टेड हेन्री यांनी सांगितले. विचार करायचा झाला तर प्रत्येक जेवणासोबत प्लॅस्टिकचे सरासरी ११४ कण पोटात जातात असं यातून समोर आलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून प्लॅस्टिकचे छोटे कण घरात प्रवेश करतात. अनेकदा कपडे, घरातील कार्पेट किंवा फर्निचरवर हे कण असतात. काहीवेळा धूळीसोबत हे कण घरात येऊ शकतात अशी शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. या संशोधनानुसार वर्षाकाठी प्रत्येक माणसाच्या शरीरात १४ ते ७० हजार प्लॅस्टिकचे कण जमा होतात.

वाचा : रात्रीचे जेवण लवकर करण्याचे ‘हे’ आहेत फायदे

फक्त ताटांवरच नाही तर अन्नाच्या माध्यमातूनही हे प्लॅस्टिकचे कण पोटात जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण हे कण कुठून येतात याचं ठोस उत्तर मात्र अजूनही त्यांनी सांगितलं नाही.