कुटुंब आरोग्य विभागाचा अहवाल   

देशातील पाच वर्षांंपेक्षा कमी वयाची निम्म्यापेक्षा अधिक बालके अशक्त असल्याची चिंताजनक माहिती कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून समोर आली आहे. देशातील पाच वर्षांपेक्षा कमी वयोमान असलेल्या मुलांची शारीरिक स्थिती अशक्त असल्याने ही मुले अतिशय सहजपणे संसर्गाना बळी पडतात. यासोबत शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यामुळे या मुलांच्या शारीरिक वाढीवर परिणाम होतो, असे कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल सांगतो. २०१५-१६ या कालावधीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सहा लाख कुटुंबांचा आढावा घेण्यात आला. पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या ३८ टक्के मुलांची वाढ योग्य प्रमाणात झालेली नाही. यासोबतच २१ टक्के मुले दुर्बल आणि ३६ टक्के मुले ही कमी वजनाची असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले.

मुलांची शारीरिक असमर्थता ठरवणाऱ्या  मापदंडांमध्ये २००५-०६ मध्ये सुधारणा करण्यात आल्या. मुलांमधील अशक्ततेचे प्रमाण वाढत असल्यामागील सर्वात मोठे कारण वाढती गरिबी असल्याचे समोर आले होते. मागील दहा वर्षांमध्ये गरिबीचे प्रमाण वाढल्याने मुलांमधील अशक्ततेचे प्रमाण वाढले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार २०१५ मध्ये देशातील पाच वर्षांपेक्षा कमी वयोमान असलेल्या बालकांची संख्या १२.४ कोटी असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे देशातील जवळपास ७.२ कोटी बालके अशक्त आहेत, तर शारीरिकदृष्टय़ा अविकसित असलेल्या मुलांची संख्या ५ कोटी, दुर्बल बालकांची संख्या २.६ कोटी आणि वयाच्या तुलनेत वजन कमी असलेल्या बालकांची संख्या ४.४ कोटी इतकी आहे. २००५-०६ च्या तुलनेत यामध्ये मोठी वाढ झालेली नाही. लोकसंख्यावाढीचा विचार केल्यास या मुलांचे प्रमाण घटल्याचा निष्कर्ष काढता येऊ  शकतो.

देशभरातील निम्म्यापेक्षा जास्त गर्भवती महिला अशक्त आहेत, असेही कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल सांगतो. गर्भवती महिला अशक्त असल्याने त्यांच्या मुलांची वाढदेखील योग्य प्रमाणात होत नाही. १५ ते ४९ वयोगटातील ५३ टक्के महिला आणि २३ टक्के पुरुष अशक्त असल्याचे कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.