23 November 2017

News Flash

मोजे न घालताच बूट घालताय?

आरोग्यासाठी धोक्याचे

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 12, 2017 3:36 PM

प्रातिनिधिक छायाचित्र

बूट घालणे ही बऱ्याचदा गरज असते तर अनेकदा ती फॅशनही असते. मुलांबरोबरच मुलींमध्येही फॉर्मल बूटांबरोबरच वेगवेगळ्या प्रकारांचे बूट वापरण्याची फॅशन सध्या इन आहे. यामध्ये लेदर, कॅनव्हास, रबरी अशा विविध मटेरियलचे बूट वापरले जातात. आता बूट म्हटले की त्यामध्ये मोजे घालणे हे ओघाने आलेच. पण तुम्ही बूटात मोजे घालण्याचा कंटाळा करत असाल तर ते पायांच्या आरोग्याच्यादृष्टीने धोक्याचे आहे. यामध्येही अँकल मोजे, एकदम घट्ट होतील असे मोजे असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. मोज्यांच्या कापडामध्ये काही प्रकार उपलब्ध असतात. त्यात कॉटन, टर्किस आणि नायलॉन यामध्ये मोजे पाहायला मिळतात. आपल्या त्वचेला अनुकूल असेच मोजे खरेदी करावेत. पण अनेकांना घाई झाली म्हणून किंवा आवडत नाही म्हणून मोजे न घालण्याची सवय असते. मात्र अशाने या व्यक्तींना काही समस्या उद्भवू शकतात. पाहूयात बूटात मोजे न घातल्याने काय होते….

१. एखाद्या अभिनेत्याचे पाहून तुम्ही बूटात मोजे घालणे टाळत असाल तर ते चुकीचे आहे. मोजे घालण्याचा कंटाळा केल्याने बूटामुळे पायाला बुरशीसारखे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. हे इन्फेक्शन दिर्घकाळ बरे न झाल्यास त्यातून गंभीर त्वचारोगही होऊ शकतात.

२. पायाला एरवीदेखील जास्त प्रमाणात घाम येतो. मोजे घातल्याने हा घाम शोषून घेतला जातो आणि त्वचा कोरडी राहण्यास मदत होते. मात्र मोजे न घातल्याने घाम तसाच पायांवर राहतो आणि पायंना दिर्घकाळ मोकळी हवा न मिळाल्याने खाज येण्याची किंवा फोड येण्याची शक्यता असते. याशिवाय अशाप्रकारे घाम बराच काळ त्वचेवर राहील्याने त्वचेला संसर्ग होण्याचा धोका असतो.

३. जर तुम्हाला मोजे घालायला आवडत नसेल किंवा इतर काही कारण असेल तर पायांना हवा लागेल अशा प्रकारचे बूट निवडावेत. त्यामुळे पाय मोकळे राहण्यास मदत होते.

४. मुलींनीही फॉर्मल बूट घालताना मोजे आवर्जून घालावेत. अनेक मुली उंच टाचांचे बूट घालत असल्याने त्यांच्या टाचांना आणि पोटऱ्यांना त्रास होण्याचा धोका असतो. मात्र त्यांनी मोजे घातल्यास पायांना काही प्रमाणात आधार मिळू शकतो.

५. बूट घालून जास्त चालावे लागत असल्यास पायाची बोटे बुटाच्या आतील बाजुने टोकावर आपटली जातात. त्यामुळे बोटे आणि नखे दुखतात. मात्र कॉटनचे थोडे जाड मोजे असतील तर अशाप्रकारे बोटे आपटली जात नाहीत आणि हे दुखणे आपण टाळू शकतो.

First Published on October 12, 2017 3:36 pm

Web Title: wearing shoes without socks is not good for health of legs