– डॉ प्रांजली गाडगीळ

मॅमोग्राम हा स्तनाचा काढलेला विशेष प्रकारचा XRay आसतो. ही तपासणी मॅमोग्राफी सेंटर मध्ये खास उपकरणे वापरून केली जाते. अगदी सूक्ष्म, कमी प्रमाणात रेडिएशन वापरून प्रत्येक स्तनाचे दोन Xray काढण्यात येतात . रेडिओलॉजिस्ट या चित्रांचा अभ्यास करुन रिपोर्ट तयार करतात.

प्रश्न – स्तनाची काही तक्रार नसेल तर मॅमोग्राफी का करावी?
उत्तर – स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये सर्वात अधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग असल्याने, ४० वर्षांपुढील प्रत्येक स्त्रीने वार्षिक ही तपासणी करावी असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. नियमित तपासणी करणाऱ्या महिलांमध्ये स्तनकर्करोगाचे निदान, गाठ हाताला लागण्या अगोदर होऊ शकते. प्राथमिक अवस्थेत उपचार झाल्यास उपचार सोईस्कर होतात आणि जिवाला धोका टळतो. सशक्त स्त्रियांमध्ये या हेतू ने केलेल्या तपासणी ला ” स्क्रिनिंग मॅमोग्राफी ” म्हंटले जाते.

प्रश्न – स्तनात गाठ असल्यास मॅमोग्रॅम करावा का सोनोग्राफी करावी?
उत्तर – ४० वर्षाखालील वयाच्या स्त्रियांसाठी अगोदर स्तनाची सोनोग्राफी म्हणजे अल्ट्रासाऊंड तपासणी केली जाते. सोनोग्राफी मध्ये Xray ना वापरता, ध्वनी लाहिरींचं वापर होतो. वय वर्ष ४० पेक्षा अधिक असल्यास, आधी मॅमोग्राफी आणि त्यानंतर आवश्यक असल्यास सोनोग्राफी केली जाते. दोन्ही तपासण्या एकमेकांना सहाय्यक असून, अनेक वेळा पूर्ण निदान करण्यासाठी दोन्ही साधनांचा वापर केला जातो. तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच या तपासण्या कराव्या.

प्रश्न – मॅमोग्रॅम मध्ये आढळणारी प्रत्येक गाठ कॅन्सरचीस असते का ?
A) ८० टक्के गाठी कॅन्सरच्या (म्हणजे मॅलिग्नन्ट) नसून इतर कारणाने आढळतात. कॅन्सर अतिरिक्त या दोषांना “बिनइन ब्रेस्ट डीसीज” म्हटले जाते. या मध्ये येतात “ब्रेस्ट सिस्ट” (Breast Cyst) ” फाइब्रोअडेनोमा” (Fibroadenoma) ” इन्फेकशन्स”(Infections) आणि अनेक इतर प्रकारचे स्तनरोग.

प्रश्न – मॅमोग्रॅम साठी जाताना काय तय्यारी करावी?
उत्तर – सकाळी अंघोळ केल्यावर डिओडरंट पावडर किंवा क्रीम इत्यादी ना लावता तपासणी साठी जावे. या तपासणी साठी उपाशी राहण्याची गरज नाही. आतापर्यंत केलेल्या सर्व मॅमोग्राफी व सोनोग्राफीचे रिपोर्ट बरोबर ठेवा. नवीन तपासणीची तुलना, आधीच्या फिल्म्स शी करणे महत्वाचे असते. आधीचे बायोप्सी अथवा सर्जरी चे रिपोर्ट देखील बरोबर ठेवावे.

प्रश्न – मॅमोग्राफी करताना त्रास होतो का ?
उत्तर –  X-ray घेताना स्तनाचा भाग ५-१० सेकंद प्लेट्स च्या मध्ये धरला जातो. यामुळे स्तनावर बाद जाणवतो. अनुभवी टेखनिशियन आणि आधुनिक उपकरणे असल्यास तपासणी अगदी सोईस्कर होऊ शकते. या साठी कॉन्ट्रास्ट किंवा I.V. ची गरज नसते.

प्रश्न – मॅमोग्राम ऍबनॉर्मल आला तर काय करावे लागते ?
उत्तर – मॅमोग्राम मधे काही अनियमितता आढळली तर त्याचे योग्य निदान करण्यासाठी अधिक तपानसण्या केल्या जातात. अनेक वेळा सोनोग्राफीने शंकानिरसन होते, तर कधी टोमॉसिन्थेसिस, किंवा ब्रेस्ट MRI या विशेष imaging साधनांचा वापर केला जातो. कर्करोगाची किंवा त्याच्या प्राथमिक अवस्थेची थोडी जरी शक्यता असेल, तर सुई ची तपासणी म्हणजे बायोप्सी केली जाते. गाठ हाताला लागत नसेल तर बायोप्सी साठी Stereotaxy किंवा सोनोग्राफी चा वापर केला जातो.

प्रश्न – मॅमोग्राफी केल्याने कॅन्सर टाळता येतो का ?
उत्तर – नियमित वार्षिक मॅमोग्राम करणाऱ्या स्त्रियांमध्ये कर्करोगाचे निदान प्राथमिक अवस्थेत होते. या मुळे उपचार सोईस्कर होऊन, जीवाला हानी टळते. मॅमोग्रफीने कॅन्सर चे जनन थांबत नाही पण वेळेवर निदान आणि उपचार साधून हानी कमी होण्यास मदत होते.

प्रश्न – फॅमिली हिस्ट्री मध्ये आई, बहीण ,मावशी, आत्या यांना कॅन्सर असेल तर काय करावे ?
उत्तर – ब्रेस्ट कॅन्सर हा ५-१० टक्के रुग्णांमध्ये अनुवांशिक असतो. अशी शक्यता असल्यास योग्य स्तनरोग चिकित्सक/ ब्रेस्ट सर्जन सल्ला घेऊन जेनेटिक टेस्टिंग करणे फायदेशीर ठरते . आपले वय, आतापर्यंतचे स्तनाच्या चाचण्यांचे रिपोर्ट, फॅमिली हिस्टरी, जेनेटिक रिपोर्ट या सर्वांचा अभ्यास करून योग्य चाचण्या किंवा उपचार सुचविले जातात.

प्रश्न -ज्या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होऊन त्याचा उपचार झाला असेल, त्यांनी पण मॅमोग्रफी करावी का ?
उत्तर – मॅस्टेकटॉमी ची शस्त्रक्रिया करून स्तनाचा पूर्ण भाग काढला असेल, तरी दुसऱ्या बाजूची वार्षिक तपासणी केली पाहिजे. स्तनाचा काही भाग राखून लंपेकटोमी केली असेल तर १-२ वर्ष दर सहा महिन्याने मॅमोग्रफी केली जाते आणि त्यानंतर वार्षिक तपासणी केली जाते. कॅन्सर रुग्णांनी ऑन्कॉलॉजिस्ट च्या सल्ल्यानुसार नियमित तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रश्न – हाताला गाठ लागत असेल आणि मॅमोग्राफी मध्ये दिसली नाही तर काय करावे ?
उत्तर – स्तनाची काही जरी तक्रार असेल तर मॅमोग्राफी करण्या आधी डॉक्टरांकाढून तपासणी करून घ्यावी. गाठ मॅमोग्रॅम मध्ये न दिसण्याची अनेक करणे असू शकतात. तपासणी करताना नीट पोसिशन दिली गेली नाही, तर स्तनाचा पूर्ण भाग चित्रामध्ये येत नाही आणि रिपोर्टींग मध्ये चूक होऊ शकते. काही महिलांमध्ये स्तनाची ठेवण घनिष्ठ असेल (डेन्स ब्रेस्ट असतील ) तर Xray ची तपासणी पुरेशी होत नाही आणि सोनोग्राफी किंवा इतर साधनांची मदत घेतली जाते. तपासण्या केल्यावर समाधान झाले नाही तर स्तनरोग चिकित्सक किंवा ब्रेस्ट सर्जन चा सल्ला घ्यावा.

(लेखिका पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये  ब्रेस्ट सर्जन आहेत.)