करोनामुळे माणसाच्या शरीरावर काही गंभीर परिणाम होतात, तशीच काही गंभीर लक्षणं देखील दिसतात. गेल्या जवळपास वर्षभराहून अधिक काळात अशी अनेक उदाहरणं, शारीरिक समस्या समोर आल्या आहेत. आता ह्यात आणखी एका समस्येची भर पडली आहे. ती समस्या म्हणजे ‘कोविड टोज’ सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर पायांच्या बोटांना होणारा अल्सर किंवा निक्रोसीसची समस्या. ही बाब चिंताजनक का आहे? तर त्याचं कारण असं आहे कि, बीबीसीने नुकत्याच दिलेल्या आपल्या अहवालात असं म्हटलं आहे कि, स्कॉटलंडमधील एका किशोरवयीन मुलीला या समस्येमुळे तब्बल ९ महिन्यांपर्यंत शूज घालणं देखील शक्य झालं नाही.

बीबीसी स्कॉटलंडच्या ‘द नाईन’शी बोलताना ही मुलगी म्हणाली कि, “माझ्या पायांना सूज आली आहे. पायाला सर्वत्र फोड आले आहेत. ही जखम अगदी कमी वेळात गुलाबी रंगापासून जांभळ्या रंगांची होते. त्याचप्रमाणे, माझ्या तळव्यांना गाठी देखील आल्यानं मला उभं राहणं देखील खरंच फार कठीण होतं. मी फक्त पायात फ्लिप-फ्लॉपच (एक प्रकारची स्लीपर) घालू शकते.”

‘कोविड टोज’ म्हणजे काय?

‘कोविड टोज’ म्हणजे आपल्या पायांच्या बोटांना झालेली इजा किंवा जखम. न्यूज-मेडिकल डॉट कॉमनुसार, सुरुवातीला गडद लाल रंगाची असणारी ही जखम हळूहळू जांभळ्या रंगाची होते. ही जखम पायाच्या एका बोटापासून सुरु होते आणि हळूहळू बाकीच्या बोटांना देखील होते.

उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या संस्थापक-संचालक डॉ. शुचिन बजाज यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं कि, “कोविड टोज हे खरंतर नुकतंच लक्षात आलेलं लक्षण आहे. ही शारीरिक समस्या अगदी १० ते १४ दिवसांपासून अनेक महिन्यांपर्यंत देखील तशीच राहू शकते. ह्यामुळे पायांची बोटं काहीशी ओबडधोबड दिसतात, लाल-जांभळी होतात आणि पायांना खाज देखील सुटते. शक्यतो यामुळे पायाच्या बोटांना वेदना होत नाहीत. मात्र, कधीकधी या वेदना अत्यंत तीव्र स्वरूपाच्या असू शकतात. ज्यामुळे रुग्णाला शूज देखील घालणं अवघड होऊ शकतं.”

कारणं

‘कोविड टोज’ या समस्येबाबतचं संशोधन अद्याप सुरु असल्यामुळे हे नेमकं का होतं? आणि कोणाला होऊ शकतं? याबाबतचं कोणतंही ठोस कारण अद्याप सांगता येणार नाही. दरम्यान न्यूज-मेडिकल डॉटकॉमनुसार, आतापर्यंत सापडलेल्या ‘कोविड टोज’च्या रुग्णांमध्ये कोरोनाची अन्य अनेक लक्षणं आढळली नाहीत. तर ज्या रुग्णांना लक्षणं आढळली आहेत ते मुख्यतः तरुण असून त्यांना हलका ताप किंवा कन्जेशन अशी लक्षणं दिसून आली आहेत. कोल्विरस इटी एएलच्या प्रस्तावित यंत्रणेनुसार असं म्हटलं आहे कि, कोविड टोज हा तरुणांच्या रोगप्रतिकारक यंत्रणेद्वारे कार्यान्वित झालेला अँटिव्हायरल इम्यून रिस्पॉन्स असू शकतो. ज्याचा परिणाम लहान रक्तवाहिन्यांशी संबंधित रोगांमध्ये होऊ शकतो.

त्याचबरोबर, मेडिकल न्यूजटुडे डॉट कॉमनुसार एक सिद्धांत असं सांगतो कि, ‘कोविड टोज’ ही शारीरिक समस्या हा कोविडचा थेट परिणाम असू शकत नाही. तर संशोधकांनी याबाबत असा विचार मांडला आहे कि, लॉकडाऊनमध्ये बदलेल्या जीवनशैलीमुळे उदा. घरात अनवाणी चालणं किंवा विशेष कोणती हालचाल न करणं, बराच वेळ एकाच जागी बसून घालवणं यामुळे देखील ही परिस्थिती उदभवू शकते.

लक्षणं

‘कोविड टोज’च्या बहुतांश रुग्णांना वेदना होत नाहीत. परंतु बोटांच्या बदलेल्या रंगांमुळे हा आजार लगेच लक्षात येतो. पारस हॉस्पिटल, गुडगावच्या त्वचाविज्ञानविषयक ज्येष्ठ सल्लागार डॉ. नंदिनी बरुआ यांनी याबाबत असं म्हटलं आहे कि, “यामुळे काही लोकांच्या त्वचेखाली पस देखील होतो.”

उपचार

बहुतांश उदाहरणांमध्ये खरंतर ही समस्या (जखम) आपोआपच बरी होते. परंतु तसं न झाल्यास आणि ही जखम कायम राहिल्यास लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधणं आवश्यक आहे. डॉ. नंदिनी बरुआ म्हणतात कि, “यासाठी विशिष्ट असे कोणतेही उपचार अद्याप नाहीत. वेदना आणि खाज थांबविण्यासाठी हायड्रोकोर्टिसोन ही क्रीम लावता येईल. दरम्यान, त्याने देखील आराम मिळाला नाही किंवा जखम सतत वाढ जात असेल तर वेळीच बोर्ड-सर्टिफाईड त्वचा रोगतज्ञाशी संपर्क साधा.”