किशोरवयात ज्यांना ऑनलाइन धाकदपटशा, छळवणुकीचा अनुभव येतो, त्यांना नीट झोप न लागण्याची आणि नैराश्याची समस्या भेडसावू शकते, असे अभ्यासकांना आढळून आले आहे. या अभ्यासामध्ये संशोधकांनी इंटरनेटच्या माध्यमातून होणारी सतावणूक आणि नैराश्य यांच्यातील संबंधांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण याचबरोबर सायबर छळवणुकीचा बळी ठरलेल्यांना (सायबर व्हिक्टिमायझेशन) कितपत व्यवस्थित झोप लागते हे जाणून घेऊ पाहणाऱ्या काही मोजक्या अभ्यासापैकी हा एक अभ्यास ठरला आहे.

या अभ्यासात अमेरिकेतील बफेलो विद्यापीठातील संशोधकांनी ८०० किशोरवयीन मुलांची पाहणी केली. या मुलांना झोप कशी लागते, त्यांच्यात सायबर आक्रमकता आणि नैराश्य आहे काय, याचा शोध या संशोधकांनी घेतला.

याबाबत बफेलो विद्यापीठातील मिसोल नोन यांनी सांगितले की, इंटरनेटवासी बनलेल्या सध्याच्या किशोरवयीन मुलांमध्ये इंटरनेट आणि सोशल मीडियावर होणारी सतावणूक किंवा सायबर छळवाद ही प्रमुख समस्या आहे. याचा कार्यकारणभाव समजून घेत असताना, अशा सतावणुकीला बळी पडून नैराश्याची लक्षणे दिसू लागलेल्या मुलांशी संवाद साधण्याची गरज दिसून येते. अशा मुलांना झोपेच्या चांगल्या सवयी लावणे, त्यांची सायबर छळवणूक होणार नाही याची दक्षता घेणे याचीही गरज आहे, असे नोन यांनी स्पष्ट केले. अनेकदा मुलांमधील नैराश्यामुळे त्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतो, कुटुंबातील व्यक्तींशी ती दुरावली जातात किंवा त्यांच्यात आत्महत्येची प्रवृत्ती बळावते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.