डॉ. तुषार पारीख

बदलत्या जीवनशैलीनुसार मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांच्या आहाराच्या सवयीदेखील बदलल्या आहेत. तूपसाखर पोळी, मेतकूट भात या सकस, पौष्टिक पदार्थांची जागा आता दूध-बिस्कीट, न्यूडल्स यासारख्या पदार्थांनी घेतली आहे. त्यामुळे अनेकदा मुलांना लहान वयातच शारीरिक तक्रारींना सामोरं जावं लागतं. यामध्येच सध्या अनेक लहान मुलांमध्ये मिल्क बिस्कीट सिंड्रोमची लक्षणं दिसू लागली आहेत.

मिल्क बिस्कीट सिंड्रोममध्ये अनेकदा लहान मुलांना बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि कोरडा खोकला अशा समस्या निर्माण होतात. फळे,भाज्या यांचं सेवन न करता केवळ बिस्किट खाण्यावर मुलांचा भर असल्यामुळे मुलाच्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी होते व त्यामुळे त्वचेवर पुरळदेखील येतात.

वयाच्या सहाव्या महिन्यानंतर मुलांना घन पदार्थांची ओळख करुन द्यावी लागते. यावेळी अनेक स्त्रिया मुलांना दूध-बिस्किट देतात. मात्र, त्यामुळे मुलांमध्ये मिल्क बिस्किट सिंड्रोम होते. बिस्किटांमध्ये असणारा मैदा हा आरोग्यास हानीकारक असतो. लहान मुलाच्या आहारामध्ये तृणधान्ये आणि डाळींचे मिश्रण आणि विविध प्रकारच्या शाकाहारी आणि फळांचा समावेश असावा. १ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना चांगला उच्च फायबरयुक्त आहार द्यावा. या वयात जंक फूड देखील पूर्णपणे टाळावा. सहा महिन्यांनंतर जेव्हा मुले पूरक पदार्थ खाण्यास प्रारंभ करतात, तेव्हा त्यास पौष्टीक पदार्थ देणे गरजेचे आहे. योग्य संतुलित आहार हे आपल्या बाळाच्या वाढीसाठी उत्तम आहे.

बाळाला सहा महिन्यानंतर देण्यात येणा-या आहारात अनेक जण मुलांना दूध आणि एक बिस्किट देतात, परंतु दूध, बिस्किटे किंवा प्रक्रिया केले, साखरेचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ खाल्ले तर मुलांमध्ये मिल्क बिस्किट सिंड्रोम होण्याची लक्षणे दिसू शकतात.

(लेखक डॉ. तुषार पारीख खराडी, पुणे येथील मदरहुड हॉस्पिटलमध्ये नवजात शिशू तज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ आहेत.)