देशभरात आज(दि.११) महाशिवरात्री साजरी केली जात आहे. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी ‘महाशिवरात्री’ म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान शंकर पृथ्वीच्या अधिक जवळ येतात. तमोगुणांचे ते प्राशन करतात, पण यादिवशी मात्र ते विश्रांती घेतात म्हणून महाशिवरात्री हा दिवस महादेवाचा सगळ्यात आवडता दिवस असतो.

काही जणांना दर सोमवारी शिवाची उपासना करणे शक्य नसते किंवा अनेकांना १६ सोमवारांचे व्रत करता येत नाही तेव्हा महाशिवरात्रीच्या एका उपवासाने या व्रताचे फळ मिळते. या दिवशी भक्तीभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. महाशिवारात्रीच्या दिवशी शंकराची पूजा केल्यास अडी अडचणी दूर होतात, महादेव प्रसन्न होतात. काही दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय. तर काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. महाशिवरात्री विषयी आणखी कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला ‘जलरात्री’ देखील संबोधतात. महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती.

महाशिवरात्रीच्या अनेक दंतकथा असल्या तरी आजचा दिवस शिवभक्तांसाठी महत्त्वाचा असतो. एका मान्यतेनुसार या दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रुप धारण केले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री १२ ते ३ या प्रहरात महादेवांचा जागर केला जातो. शंकराला बेलपत्र, रुद्राक्ष प्रिय आहेत म्हणून ते अर्पण केले जातात. या दिवशी शंकरांच्या पिंडिवर अभिषेक केला जातो. बेलपत्र पांढरी फुले, धोत्रा, आंबा यांची पत्री आणि भस्म अर्पण केला जातो. काही ठिकाणी गंगाजलाचा अभिषेकही केला जातो.