16 November 2019

News Flash

पावसाळ्यात डासांपासून होणारे आजार कसे टाळाल ?

मान्सून ही दुधारी तलवार असते...

(संग्रहित छायाचित्र)

-डॉ. मुकेश संकलेचा

मान्सून ही दुधारी तलवार असते – उन्हाच्या काहिलीपासून मान्सूनमुळे दिलासा मिळतो, तर त्याच वेळी मान्सूनमुळे अनेक संसर्गजन्य आजार व विकार होतात. काही वेळा हे आजार जीवनासाठी घातकही ठरू शकतात. वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, बालके या आजारांना सहजपणे बळी पडू शकतात, असे निदर्शनास आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २०१७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात आढळले आहे की, मलेरियाचे २१९ दशलक्ष रुग्ण आढळले व मलेरियामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये पाच वर्षांखालील बालकांचे प्रमाण ६१% होते. या मृत्यूदरातून अशा आजारांचे गांभीर्य अधोरेखित होते.

आकडेवारी चिंताजनक आहे आणि भारताच्या दृष्टीने गंभीर आहे. २०३० व २०५० या दरम्यान, हवामानातील बदलामुळे दरवर्षी डेंग्यु व मलेरिया यामुळे हजारो मृत्यू होणार आहेत आणि त्याचे सर्वाधिक बळी महिला, बालके व गरीब ठरणार आहेत, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवला आहे. संघटनेने म्हटले आहे की, ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमानात व पावसाच्या पद्धतीमुध्ये होणारे बदल यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, व्हेक्टर-बोर्न आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढेल.

भारताची झपाट्याने वाढती लोकसंख्या सामावून घेण्यासाठी पुरेशी जमीन उपलब्ध नसल्याने शहरी भागात झोपडपट्टीचे प्रमाण वाढते आहे. त्यामध्ये योग्य पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्था व घनकचरा व्यवस्थापन यांचा अभाव आहे. याचा परिणाम होऊन, आरोग्यविषयक समस्या मोठ्या संकटाचे रूप धारण करू शकतात व त्यामुळे असंख्य लोकांना डासांमुळे पसरणारे व्हायरल आजार होण्याचा धोका निर्माण होतो.

एक डॉक्टर म्हणून, वैद्यकीय बाबतीत, नंतर उपचार करण्यापेक्षा अगोदर प्रतिबंध केलेला केव्हाही चांगला. साचलेले पाणी व दूषित पाणी यामुळे मान्सूनच्या काळामध्ये डासांसारख्या रोगवाहकांमुळे होणारे आजार उद्भवतात व वाढतात.  मलेरिया व डेंग्यु हे आजार होण्याचा अंदाज अचूकपणे वर्तवता येत नाही व ते संपूर्णपणे थोपवता येत नाहीत. हे आजार होण्याचा धोका कमी करण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये व आरोग्यसेवेमध्ये पुरेसे आत्म-संरक्षक उपाय योजता येऊ शकतात.

वैद्यकीय निदानामध्ये, क्लिनिकल परिणाम चांगले मिळण्याच्या हेतूने कॉज-इफेक्ट हा दृष्टिकोन अवलंबला जातो. प्रतिबंधात्मक उपाय योजून त्याद्वारे आजाराला कारणीभूत ठरणारे एजंट किंवा पॅथोजन्स हे आजाराचे कारण दूर करणे, ही अनेकदा हे आजार होणे टाळण्याची पहिली सर्वोत्तम पद्धत असते. या आजाराचे संक्रमण थोपवण्यासाठी, तीव्र जंतूनाशके असणारा मेडिकल स्प्रे फवारावा, जेणे करून आजार पसरवणारे डास कमकुवत होता. पाणी साचण्याची शक्यता असणाऱ्या परिसरांमध्ये पाणी वाहून जाण्याची पुरेशी व्यवस्था करणे गरजेचे आहे.

वैयक्तिक पातळीवर, शक्य तितके अंगभर कपडे घालून डास चावण्याचे प्रमाण कमी करून स्वतःचे संरक्षण करावे. यावरील प्रभावी व लोकप्रिय उपाय म्हणजे, क्रीम, रोल-ऑन्स, लोशन असे मॉस्किटो/इन्सेक्ट रिपेलंट वापरावेत. हे सगळे पर्याय ओव्हर द काउंटर (ओटीसी) उपलब्ध असून त्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन गरजेचे नसते. डासांपासून संरक्षण करण्यासाठी क्रीम व पॅचेस सर्वात जहल उपाय ठरतात. परंतु, हे सगळे पर्याय प्रौढांसाठी योग्य ठरतात. लहान मुलांना थेट त्वचेवर लावल्या जाणाऱ्या लोशनचा चिकटपणा आवडत नाही, असे दिसून येते.

वैद्यकीय क्षेत्रातील माझ्या अनुभवानुसार, लहान मुले इन्सेक्ट रिपेलंट धुवून टाकतील किंवा खाऊन टाकतील, या भीतीने पालकांना ते मुलांच्या त्वचेऐवजी कपड्यांवर लावणे योग्य वाटते. पॅचेस व रोल-ऑन असे वैयक्तिक रिपेलंटही उपलब्ध आहेत. त्यांचा वापर घराबाहेर जाताना करता येऊ शकतो. वापरण्यास सुरक्षित असणारे अनेक पर्याय सध्या बाजारात मिळतात. गर्भवती स्त्रियांसाठी व संवेदनशील त्वचा असणाऱ्या बाळांसाठीही असे पर्याय नैसर्गिक व वापरण्यास सुरक्षित स्वरूपात मिळतात. पालक केमिकल कम्पाउंड वापरण्याबाबत नेहमी जागरुक असतात व घरात असो वा बाहेर, डासांपासून चांगले संरक्षण देणारे सिट्रोनेला, युकॅलिप्टस ऑइल असे नैसर्गिक घटक असणाऱ्या रिपेलंटना प्राधान्य देतात. तसेच, रोल-ऑन वॉटरप्रूफ असणे गरजेचे आहे; अन्य पावसात बाहेर पडल्यावर ते धुतले जाऊ शकते.

डासांमुळे होणारे आजार नियंत्रित करण्यासाठी, रोगवाहकांचे वर्तन माहीत असणेही महत्त्वाचे असते. अंधार झाल्यावरच केवळ डास हल्ला करतात, असा अनेक पालकांचा समज असतो. म्हणूनच, घरात असताना ते मॉस्किटो रिपेलंटवर अवलंबून असतात. परंतु, हा परिपूर्ण उपाय नाही. मलेरियाला कारणीभूत ठरणारे अनोफिलेस डास संध्याकाळी व पहाटे चावतात, असे शास्त्रीय अभ्यासात आढळले आहे. तर, चिकनगुनिया व डेंग्यु होण्यास कारणीभूत ठरणारे एडिस डास साधारणपणे दिवसा हल्ला करतात. त्यामुळे, ही समस्या सोडवण्यासाठी वेळ व ठिकाण यांचा विचार न करता २४x७ सज्ज राहणे गरजेचे आहे.

एक डॉक्टर म्हणून, स्वतःच निदान करणे आणि स्वतःच औषधे घेऊन आजाराच्या लक्षणांवर उपचार करणे टाळले पाहिजे, असा सल्ला देईन. रोगवाहकामुळे एखादा आजार झाल्याचा संशय निर्माण झाल्यास त्याचे लवकर निदान होण्यासाठी व वेळेवर उपचार होण्यासाठी एखाद्या नोंदणीकृत मेडिकल प्रॅक्टिशनरचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

(कन्सल्टंट पिडिअॅट्रिशिअन, बॉम्बे हॉस्पिटल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, मुंबई)

First Published on June 13, 2019 4:30 pm

Web Title: what precautions should take from mosquito diseases in rains sas 89