अमर पंडित

सध्या आपल्याकडे गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडाचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे आणि या क्षेत्रांमध्ये गुंतवणुक करणाऱ्याची संख्याही वाढली आहे. तरीही गुंतवणुकीचा निर्णय करताना ‘परतावा (रिटर्न्स)’ एवढी एकच बाब विचारात घेतली जात आहे असे दिसते. जेव्हा लोक परतावा किंवा मोबदला हा एकमेव निकष ठेवून गुंतवणूक करतात आणि त्यासाठी सीए, बँका, कुटुंबीय, मित्रमंडळी यांचा सल्ला घेतात, तेव्हा ते कालांतराने अनेक नको असलेली उत्पादने घेऊन गोंधळ करून ठेवतात. ही उत्पादने अनेकदा त्यांच्या विशिष्ट गरजेला अनुकूल नसतात.

तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून पुरेपूर फायदा मिळेल याची खात्री करण्यासाठी तुम्ही काही मुद्दे ध्‍यानात ठेवणे आवश्यक आहे. पहिला मुद्दा म्हणजे, म्युच्युअल फंड तुमच्या गरजा, उद्दिष्टे, कालकक्षा व जोखीम पत्करण्याची तयारी यांनुसार कस्टमाइझ केले जाऊ शकतात. तेव्हा थोडे थांबा आणि तुम्हाला पैसा नेमका कुठे वळवायचा आहे याचा विचार करा. त्यामुळे तुम्हाला एक व्यक्तिगत गरजांवर आधारलेली अशी योजना नक्कीच घेता येईल आणि ती तुम्हाला चांगला परतावाही देईल. दुसरा मुद्दा म्हणजे, बाजारात चढउतार होत राहणार आहेत आणि या बदलांनुसार तुमच्या योजनेत बदल करत राहाल तर दीर्घकाळात नुकसानच सोसावे लागेल.

बाजार देऊ करत असलेला मोबदला पुरेपूर घ्यायचा असेल, तर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही या काही मुद्दयांचा विचार केलाच पाहिजे.

गुंतवणुकीची उद्दिष्टे

जेव्हा एखादे निश्चित उद्दिष्ट/लक्ष्य डोळ्यापुढे असते तेव्हा लोक ते साध्य करण्यासाठी अधिक कष्ट करतात, हे अनेकदा सिद्ध झालेले आहे. म्हणूनच, आर्थिक उद्दिष्टे निश्चित करताना हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. तुमची उद्दिष्टे ठोस, निश्चित आणि मापनीय असतील हे बघा. मनात निश्चित हेतू असेल, तर नियमित गुंतवणूक करणे अधिक सोपे होते.

योजनांमध्ये वैविध्य

म्युच्युअल फंडांमध्ये योजनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध असते; लिक्विड फंड्स, डेट फंड्स, इक्विटी फंड्स आणि इक्विटी लिंक्ड बचत योजना. प्रत्येक योजना वेगळा उद्देश साध्य करून देते. तुमच्या गुंतवणुकीमागील हेतू डोक्यात ठेवा आणि योग्य ती योजना निवडा.

जोखीम विरुद्ध मोबदला

जोखीम पत्करण्याची कमी-अधिक तयारी लक्षात घेऊन म्युच्युअल फंड आक्रमक, समतोल आणि पारंपरिक स्वरूपाच्या योजना देऊ करतात. केवळ २० टक्के मोबदल्याच्या तर्कदोषाला भुलून जाऊ नका, योजनेचे स्वरूप समजून घ्या आणि तुम्हाला अनुकूल अशी योजना निवडा.

अनुकूलता

गुंतवणूक करताना तुमच्या गुंतवणुकीच्या कालकक्षेचा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. म्युच्युअल फंड प्रत्येकाच्या गरजेनुसार व्यापक वैविध्यपूर्ण पर्याय पुरवतो. तुमच्या गरजा काय आहेत व जोखीम पत्करण्याची तयारी किती आहे हे समजून घ्या. उदाहरणार्थ, इक्विटी म्युच्युअल फंडात दोन वर्षांच्या काळासाठी गुंतवणूक करणे हा चांगला पर्याय होऊ शकत नाही, कारण, या प्रकारच्या म्युच्युअल फंडांमध्ये छोट्या कालावधीत चढउतार येऊ शकतात. ५ वर्षांहून अधिक काळ गुंतवणूक करायची असेल, तरच अशा योजना प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.

तेव्हा सर्वांत उत्तम म्हणजे उद्दिष्टांवर आधारित वित्तीय योजना तयार करा, या उद्दिष्टांच्या दिशेने जाण्यासाठी योग्य ती गुंतवणूक करा आणि बाजारातील गोंधळाकडे पूर्ण दुर्लक्ष करून ही गुंतवणूक वाढत राहू द्या. योग्य उत्पादनाचे मूल्यमापन करण्याहून अधिक चांगले योग्य त्या सल्लागाराचे मूल्यमापन करा. हा सल्लागार तुम्हाला योग्य निर्णय करण्यात मदत करेल.

(लेखक सीएफए आणि HappynessFactory.in चे संस्थापक आहेत )