News Flash

मोबाइल हरवला तर..

मोबाइल हरवणे किंवा चोरीला गेल्यास तो पुन्हा आपल्याला मिळेल, याची शाश्वती नसते.

‘मोबाइल हरवला तर..?’ हा प्रश्नच मुळात मनात धडकी भरवणारा आहे. मोबाइल आपल्या दैनंदिन आयुष्यातील अविभाज्य घटक बनला असल्याने तो हरवणेच काय पण काही वेळासाठी आपल्यापासून दूर असणे, ही कल्पनाच धास्तावणारी आहे. आपले संपर्क क्रमांक, छायाचित्रे, मेसेज, व्हिडीओ, आर्थिक तपशील, सोशल मीडिया खाती असा बहुमूल्य दस्तावेज स्मार्टफोनमध्ये साठवलेला असतो. असा स्मार्टफोन गहाळ किंवा चोरी होणे खूपच क्लेशकारक असते. त्यामुळे प्रत्येक जण मोबाइलची खूप काळजी घेत असतो. मात्र तरीही ‘मोबाइल हरवला तर..?’

मोबाइल हरवणे किंवा चोरीला गेल्यास तो पुन्हा आपल्याला मिळेल, याची शाश्वती नसते. मात्र त्याहीपेक्षा भीती असते, आपला बहुमूल्य डेटा दुसऱ्या व्यक्तीच्या हातात सापडण्याची. त्यामुळे असे विपरीत घडल्यास काय करायला हवे, याचे मार्गदर्शन.

सतत फोन करत रहा

मोबाइल सापडेनासा झाल्यास आपण सर्वप्रथम फोन करून तो कुठे आहे किंवा कोणाच्या हातात आहे का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. ते योग्यही आहे. एखाद्या वेळी मोबाइल सापडला ती व्यक्ती मूळ मालकाचा शोध घेत असेल. त्यामुळे लगेच हताश न होता मोबाइल चांगल्या हाती सापडला असेल आणि ती व्यक्ती तो आपल्याला परत करेल, ही आशा ठेवणे आवश्यक. जर मोबाइल रिंग होतोय आणि कुणीही तो कॉल उचलत नसेल तर आपला मोबाइल अद्याप तरी कुणाच्या हाती पडला नाही, अशी शक्यता गृहीत धरायला हरकत नाही. मात्र मोबाइल बंद असेल तर तुम्हाला पुढच्या गोष्टी कराव्याच लागतील.

बँक, वॉलेट खाती सुरक्षित करा

मोबाइल हरवला किंवा चोरीला गेल्यास तुम्हाला तुमचे बँक किंवा वॉलेटचे अ‍ॅपही सुरक्षित करणे आवश्यक असते. कारण मोबाइल ज्या व्यक्तीच्या हाती आहे ती तुमच्या खात्यांवरून पैसे लंपास करू शकते किंवा खरेदीसाठीही त्याचा वापर करू शकते. त्यामुळे ताबडतोब बँक किंवा वॉलेट सेवा पुरवणाऱ्या कंपनीशी संपर्क साधून त्यातील व्यवहार रोखण्याच्या सूचना करा. यामुळे तुमचा मोबाइल तर परत मिळणार नाही मात्र, त्याद्वारे आर्थिक लुबाडणूक होण्याची भीती नाहीशी होते.

जीपीएसमार्फत मोबाइलचा शोध

तुम्ही ‘जीपीएस’च्या मदतीनेही तुमच्या फोनचा ठावठिकाणा शोधू शकता. अ‍ॅण्ड्रॉइड फोनमध्ये अशा ट्रॅकिंगची सुविधा असते. तुम्ही तुमच्या गूगल खात्याद्वारे फोनचा शोध घेऊ शकता.

मोबाइल लॉककरण्याचा प्रयत्न करा

आपल्या स्मार्टफोनवर नेहमी पॅटर्न, फिंगरप्रिंट किंवा फेस रेकग्निशन लॉक सुरू ठेवा. याचा फायदा तुमचा मोबाइल हरवल्यावर नक्की होतो. किमान तुमचा मोबाइल चुकीच्या हातांत पडला तरी तुमचा डेटा त्यांच्यापासून सुरक्षित राहू शकतो. पण समजा तुम्ही मोबाइलवर लॉकचा पर्याय सुरू ठेवला नसेल तरी तुम्ही तो हरवल्यानंतर लॉक करू शकता. तुमच्याकडे अ‍ॅपलचा आयफोन असेल तर अन्य आयफोनवरून तुमचे खाते सुरू करून तुम्ही ‘लॉस्ट मोड’ सक्रिय करू शकता. याखेरीज ‘फाइंड माय आयफोन’ या पर्यायाचा वापर करून तुमच्या आयफोनचा शोधही तुम्ही घेऊ शकता.  तुमच्याकडे अ‍ॅण्ड्रॉइड फोन असेल तर अन्य मोबाइलवरून किंवा गुगल क्रोम ब्राऊजरवरून तुम्ही ‘अ‍ॅण्ड्रॉइड डिव्हाइस मॅनेजर’ चालू करून ‘फाइंड माय डिव्हाइस’च्या पर्यायाच्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाइलच्या लोकेशनचा शोध
घेऊ शकता. ‘अ‍ॅण्ड्रॉइड डिव्हाइस मॅनेजर’च्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाइल सुरक्षितही करू शकता. तो पर्याय

निवडताच तुमच्या हरवलेल्या मोबाइलवर त्याबाबतचा संदेश झळकण्यास सुरुवात होते. तुम्ही या माध्यमातून तुमच्या मोबाइलमधील सर्व डेटा पूर्णपणे नष्टही (वाइप) करू शकता.

पोलिसांशी संपर्क करा

तुमचा मोबाइल हरवलेला असो की चोरीला गेलेला. यासंदर्भात नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करून तक्रार करणे कधीही योग्य. एकतर यामुळे तुम्हाला नवीन सिमकार्ड खरेदी करताना कंपनीला सिमकार्ड गहाळ झाल्याचा पुरावा देता येतो. पण त्यासोबतच तुमच्या मोबाइलचा गैरवापर झाल्यास किंवा गैरकामासाठी तो वापरला गेल्यास मागाहून येणाऱ्या कायदेशीर अडचणींतून तुमची सुटका होऊ शकते.

समाजमाध्यम खात्यांचे पासवर्ड बदला

स्मार्टफोनवर सोशल मीडियावर सक्रिय असलेले अनेक अ‍ॅप असतात. या अ‍ॅपमध्ये तुमची खासगी माहिती साठवलेली असतेच; पण त्यात तुमच्या मित्रमंडळींचे तपशील किंवा संदेशही साठवलेले असतात. चुकीच्या हातात तुमचा मोबाइल पडल्यास ती व्यक्ती तुमच्या सोशल मीडिया खात्यांचा गैरवापर करू शकते. तुमची खासगी छायाचित्रे किंवा चित्रफिती प्रसारीत करणे, तुमच्या मित्रमंडळींना संदेश पाठवून पैशांची मागणी करणे, तुमच्या खात्यांचा वापर करून गैरकृत्ये करणे यासारखे प्रकार घडू शकतात. त्यामुळे मोबाइल हरवल्यास तुम्हाला या सर्व समाजमाध्यम खात्यांचे पासवर्ड बदलावे लागतील. तुमच्या गूगल किंवा अन्य ईमेलचे पासवर्डही बदला.

सिमकार्ड रद्द करा

आपला मोबाइल आता पुन्हा सापडण्याची शक्यता नाही, याची खात्री होताच ताबडतोब तुमच्या मोबाइल सेवा पुरवठादार कंपनीला फोन करून त्या मोबाइलमधील सिमकार्ड रद्द करण्याची सूचना करा. यामुळे तुमच्या मोबाइल क्रमांकाचा गैरवापर होण्याची भीती दूर होते. दुसरे म्हणजे, आपल्या बँकिंग व्यवहारांसाठीचे ‘ओटीपी’ मोबाइल क्रमांकावर ‘एसएमएस’ने पाठवले जातात. तुम्ही सिमकार्ड रद्द करताच हा धोकाही दूर होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 1:49 am

Web Title: what to do when phone is lost or stolen how to find lost android phone zws 70
Next Stories
1 पेगाससच्या हल्ल्यापासून iPhones देखील १००% सुरक्षित नाहीत? सुरक्षा वाढवण्यासाठी Apple चे प्रयत्न सुरु
2 तुम्हीही ब्रश करताना ‘या’ ५ चुका करताय? वेळीच टाळा!
3 Amazon Prime Day Sale starts July 26: स्मार्टफोन्स, लॅपटॉप्ससह गॅजेट्सवर सवलतींचा वर्षाव
Just Now!
X