बचत खाती ही बँकेच्या इको-सिस्टीमशी जोडणारी सर्वाधिक लोकप्रिय आर्थिक उत्पादने असतात. याच्या नावातूनच हे लक्षात येतं की, बचत खात्यामुळे त्या व्यक्तीवर बचत करण्याचे संस्कार होतात. बचत खात्यामुळे पैसे आवश्यक असतील तेव्हा ते खात्यातून काढून घेण्याची आणि पुरेशा प्रमाणात रोख शिल्लक ठेवणे शक्य होतं. ग्राहकांच्या गरजांनुसार बँका विविध प्रकारची बचत खाती उपलब्ध करून देतात, जी त्यांच्यात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या सुविधांच्या आधारे ओळखली जाऊ शकतात. बचत खात्याची निवड करताना कोणते महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे हे आता आपण पाहू या.

तुम्हाला किती शिल्लक रक्कम ठेवावी लागते?

बँका नो-फ्रिल्स बचत खाती (बेसिक सेव्हिंग्ज बँक अकाऊंट, म्हणजेच बीएसबीडी) उपलब्ध करून देतात, ज्यात किमान शिल्लक रकमेची आवश्यकता नसते. तसेच अनिवार्य किमान शिल्लक रकमेची आवश्यकता असलेल्या अनेक वैशिष्ट्यांनी युक्त बचत खाते उपलब्ध करून देतात. अलिकडे बहुतेक बँका खातेधारकाची अनिवार्य किमान रकमेची आवश्यकता ठरवण्यासाठी मासिक सरासरी शिल्लक रक्कम (एमएबी) विचारात घेतात. नेहमीच्या बचत खात्यासाठी किमान शिल्लक रक्कम २५०० रुपये ते १०००० रुपये एवढी किंवा काही बाबतीत यापेक्षा अधिक असू शकते. खात्याशी जोडलेल्या सुविधांनुसार किमान शिल्लक रक्कम वाढत जाते. म्हणून तुम्ही जर प्रिमियम किंवा एचएनआय बचत खात्याची निवड करणार असलात, तर त्यासाठीची किमान शिल्लक रकमेची आवश्यकता बेसिक, नो-फ्रिल्स खात्यापेक्षा कैक पटींनी अधिक असू शकते. म्हणून तुम्ही जर बचत खात्याची निवड करण्याचा विचार करीत असलात, तर त्यात किती किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागेल आणि त्यात तुम्हाला कोणत्या सुविधा मिळतील हे तपासून पहा.

किती प्रक्रिया शुल्क असते ?

ऑनलाईन पैसे हस्तांतरित करणे, धनादेशपुस्तिका सुविधा, कॅश डिपाझिट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, बँक खात्याच्या विवरणाची छापील प्रत, पासबुक पुन्हा देणे, लॉकर सुविधा आणि अशा अनेक सुविधांसाठी बँका तुमच्याकडून किती शुल्क वसूल करू शकतात. तुम्हाला खात्यात पैसे ठेवणे आणि प्रसंगी धनादेशाच्या माध्यमातून पैसे देणे यांसारख्या फक्त मूलभूत गरजांसाठी बचत खाते हवे असेल, तर नेहमीचे बचत खाते तुमच्या गरजा भागवू शकेल. तुम्ही जर अशा बचत खात्याच्या शोधात असाल, जे त्याच्या अनेक उत्पादनांसाठी तुमच्याकडून आकार वसूल करीत नसेल तर तु्म्ही प्रिमियम किंवा हाय-एंड बचत खात्यांचा विचार करू शकता.

जास्तीचे फायदे तपासून पहा

काही बँका अशी बचत खाती उपलब्ध करून देतात, ज्यात तुम्ही २० टक्के ते ५० टक्के सूट, मोफत डेबिट आणि क्रेडिट कार्ड्‌स, ठरावीक कालावधीनंतर गरजेनुरूप मोफत धनादेशपुस्तिका (विशिष्ट मर्यादेसह), घरपोच रोख रक्कम, धनादेश गोळा करण्याची सुविधा, इत्यादी पुरवितात. बचत खात्यासोबत डेबिट/क्रेडिट कार्ड्‌स मोफत मिळतात, ज्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील लाऊंजमध्ये, प्रायोरिटी कार्ड, पंचतारांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स मध्ये सवलतीच्या दरात, चित्रपटाची मोफत तिकिटे, इत्यादी मिळतात. त्याचप्रमाणे, काही बचत खात्यातील डेबिट कार्डने मोठी रक्कम खात्यातून काढता येते आणि खर्च करण्याची मर्यादाही अधिक असते. काही बचत खात्यांसोबत डिमॅट खात्याची सुविधा असते, ज्याचा खर्च शून्य असतो, गुंतवणुकीचा मोफत सल्ला दिला जातो आणि संपत्तीचे व्यवस्थापन करण्याच्या सुविधा पुरविल्या जातात.

बचत खात्यात तुम्हाला किती व्याज मिळेल?

सामान्यत:, बँका बचत खात्यांवर द.सा. ३.५ टक्के ते ४ टक्के व्याज देतात. परंतु काही बँका बचत खात्यांवर सुमारे ६ टक्के ते ७ टक्के एवढा उच्च व्याजदर देतात. बचत खात्यातील १०,००० पर्यंतचे व्याज आयकर कायद्याच्या कलम ८० टीटीए अंतर्गत वजावटीसाठी पात्र असते. तुम्ही जर तुमच्या बचत खात्यात मोठी रक्कम ठेवणार असलात, तर व्याजदरातील फरक हा घटक योग्य बचत खाते निवडताना विचारात घेतला पाहिजे. बचत खात्यातील व्याज दैनंदिन शिलकीच्या आधारे हिशोबात घेतले जाते, म्हणून तुमच्या एकूणच परताव्यात, जास्त व्याजदर देणाऱ्या खात्यामुळे मोठा फरक पडू शकतो.

स्वीप-ईन सुविधेची उपलब्धता

तुमच्या बचत खात्यासोबत स्वीप-ईन एफडी सुविधा उपलब्ध आहे किंवा काय हे तुमच्या बँकेला विचारा. स्वीप-ईन सुविधेत तुम्ही बचत खात्यातील शिल्लक रकमेवर एक विशिष्ट मर्यादा घालून देऊ शकता आणि जर एकूण शिल्लक रक्कम ह्या मर्यादेपेक्षा अधिक झाली, तर जास्तीची रक्कम (१००० रुपयांच्या पटीत) मुदतठेव खात्यात हस्तांतरित करण्यात येतील. परंतु तुम्हाला जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही तुमच्या मुदतठेवीतून १ रुपयाच्या पटीत रक्कम काढू शकता आणि शिल्लक रकमेवर मुदतठेवीवरील व्याज मिळवू शकता.

बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून/रिलेशनशिप मॅनेजरकडून सहकार्य

तुम्ही जर प्रिमियम किंवा हाय-एंड बचत खात्याची निवड केलेली असेल, तर सामान्यत: बँक तुमच्यासाठी रिलेशनशिप मॅनेजर उपलब्ध करून देईल, जे तुमच्या व बँकेच्या मध्ये जलद संपर्कासाठी आणि तुमच्या समस्या जलदगतीने सोडविण्यासाठी संपर्क बिंदू म्हणून काम करतात. समर्पित रिलेशनशिप मॅनेजरच्या साह्याने कर्जे, डिमॅट खाते, क्रेडिट कार्ड्‌स, इत्यादींसारख्या अतिरिक्त बँकिंग आणि वित्तीय सेवा समजून घेणे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपे होते आणि त्यामुळे तुमचा भरपूर वेळ वाचतो.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार