व्हॉट्स अॅपवरील मेसेज आता पाच पेक्षा जास्त काँटॅक्ट्सना एकाचवेळी फॉरवर्ड करता येणार नाही हे फीचर आता लागू करण्यात आले आहे. फेक न्यूजचा प्रसार थोपवण्यासाठी तसेच अफवांचा वेगानं पसरू नयेत यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार असल्याचं गेल्या महिन्यात कंपनीनं जाहीर केलं होतं. त्याची अमलबजावणी करण्यात आली असून आता भारतामध्ये व्हॉट्स अॅप यूजर्सना कुठलाही मेसेज एकाचवेळी पाचपेक्षा जास्त जणांना फॉरवर्ड करता येणार नाही.

जमावानं केलेल्या मारहाणीमध्ये काहीजणांचा मृत्यू झाला होता. मुलं पळवणारी टोळी किंवा गोतस्कर आदी संशय घेत घडलेल्या या हत्यांमागे व्हॉट्स अॅपवरून पसरवण्यात आलेल्या अफवांचा हात असल्याचे समोर आले होते. त्यामुळे भारत सरकारनेही फेसबुक व व्हॉट्स अॅपसारख्या मेसेजिंग सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना कडक पावले उचलण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत व्हॉट्स अॅपने हे फीचर लागू केले आहे.

जागतिक स्तरावरही व्हॉट्स अॅप फॉरवर्डची संख्या 20 इतकी मर्यादित करण्यात आली आहे. भारतामध्ये व्हॉट्स अॅपचे युजर्स 20 कोटी इतके असून ही जगातील सगळ्यात जास्त ग्राहकसंख्या आहे. बुधवारी कंपनीनं जाहीर केले की सदर नवीन फीचर भारतातल्या ग्राहकांना या आठवड्यात अनुभवायला मिळण्यास सुरूवात झाली आहे. पाचपेक्षा जास्त जणांना मेसेज फॉरवर्ड करायचा प्रयत्न केल्यास “तुम्ही केवळ पाच जणांना हा मेसेज शेअर करू शकता” असा मेसेज येतो व तो फॉरवर्ड होत नाही.

विशेष म्हणजे एखादा व्हीडियो, फोटे अथवा ऑडियो मेसेज जर पाच वेळा फॉरवर्ड केला असेल तर त्यानंतर त्या युजरला तो संदेश आणखी कुणाला फॉरवर्ड करताच येणार नाही असेही फीचर लागू करण्यात आले आहे. त्यामुळे अशा प्रकारचा मीडिया मेसेज कुणालाही 25 पेक्षा जास्त काँटॅक्टना फॉरवर्ड करता येणार नाही. जगामध्ये कुठेही नाही इतकं मेसेज फॉरवर्ड करण्याचं प्रमाण भारतात असल्याचं यापूर्वी व्हॉट्स अॅपनं म्हटलं होतं.

या उपायांमुळे अफवा लवकर पसरण्यावर आळा बसेल अशी आशा व्हॉट्स अॅपनं व्यक्त केली आहे. युजर्सना प्रशिक्षित करण्यासाठी व्हॉट्स अॅपनं एक व्हीडियोही पब्लिश केला असून फेक न्यूज व अफवा थांबवण्याचं आवाहन केलं आहे. युजर्सनी कुठलाही संदेश फॉरवर्ड करण्याआधी दोन वेळा त्याच्या खरेपणाबद्दल, तो मूळ कुणी लिहिला आहे आदीबाबत खात्री करावी असं आवाहनही कंपनीनं केलं आहे.