व्हॉट्सअॅप हे भारतात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप आहे. या अॅपनं नुकतंच आपलं पेमेंट फीचर आणलं. या फीचरमुळे डिजीटल व्यवहार करता येणार आहे. या अतिमहत्त्वाच्या फीचरनंतर व्हॉट्सअॅपनं ग्रुप चॅट युजर्ससाठी नवं फीचर आणलं आहे. ‘ग्रुप डिस्क्रिप्शन’ असं या फीचरचं नाव आहे.

या फीचरमुळे ग्रुप अॅडमिन किंवा ग्रुपमध्ये असणारे इतर युजर्स ग्रुप स्थापन करण्याचा हेतू काय आहे हे लिहू शकतात. याव्यतिरिक्त ग्रुपमध्ये चर्चा करताना महत्त्वाचा मुद्दा चॅट बॉक्समध्ये सर्वात वर पीन करूनही ठेवू शकतात. अनेकदा ग्रुपमध्ये चॅट करताना ग्रुप तयार करण्यामागचा उद्देश बाजूलाच राहतो आणि भलत्याच गोष्टीसाठी ग्रुप वापरला जातो. एखाद्या विषयावर चर्चा करताना चर्चाही भरकटते तेव्हा ‘ग्रुप डिस्क्रिप्शन’ या फीचरमुळे ग्रुप मेंबर्सना याचा फायदा होणार आहे.

हे फीचर वापरून अॅडमिन ग्रुपमध्ये मेंबर्ससाठी ५०० शब्दांपर्यंत डिस्क्रिप्शन लिहू शकतो. तसेच डिस्क्रिप्शन लिहिल्यानंतर ग्रुप चॅटवर त्यासंबंधी नोटिफिकेशनही येणार आहेत. सध्या हे फीचर व्हॉट्स अॅपचे बीटा व्हर्जन २.१८.५४ आणि विंडोज फोनमध्ये व्हॉट्स अॅपचे बीटा व्हर्जन २.१८.२८ वर उपलब्ध आहे. नुकतंच व्हॉट्स अॅपनं ‘व्हॉट्स अॅप पेमेंट’ हे महत्त्वाचे फीचर आणलं. ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI)’वर ही प्रणाली असून त्याद्वारे पैसे पाठवता किंवा स्विकारता येणार आहेत. यासाठी दोघांकडे युपीआय पेमेंटचा पर्याय असणं मात्र आवश्यक असणार आहे. या फीचरसाठी व्हॉट्स अॅपने आयसीआयसीआय, एचडीएफसी, अॅक्सिस, एसबीआय, यस बँक या बँकांसह देशातील इतरही मोठ्या बँकांशी करार केला आहे.