व्हॉट्स अॅप हा आपल्यासाठी जणू अविभाज्य भागच झाला आहे. सुरुवातीला मोफत मेसेज पुरवणाऱ्या या अॅपनं गेल्या काही वर्षांत आपल्यात शेकडो बदल केलेत. व्हॉट्स अॅपनं पुरवलेल्या फीचर्समुळे आपली कितीतरी कामं सोपी झाली आहेत. आपल्यातील अनेकजण आता व्हॉटसअॅपशिवाय जगण्याचा विचारही करु शकत नाहीत. एखादा महत्त्वाचा निरोप देण्यापासून ते परदेशातील व्यक्तीशी संपर्क करण्यापर्यंत अनेक कामे व्हॉटसअॅपमुळे सोपी झाली आहेत. एकमेकांना फोटो, व्हिडीयो किंवा फाईल पाठवणे, लोकेशन शेअर करणे, फोन किंवा व्हिडीयो कॉलिंग करणे सोपे झाले आहे. यामध्ये आता आणखी एका फिचरचा समावेश झाला असून हे अॅप्लिकेशन वापरणे सोपे होणार आहे.

हे नवे फिचर कोणते असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर व्हॉट्सअॅप न उघडताही तुम्हाला चॅटींग करता येणार आहे. फेसबुकच्या F8 कॉन्फरन्समध्ये व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी नवीन फिचरची माहिती दिली आहे. यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअॅपवर एखादा मेसेज आला की तो तुमच्या स्क्रीनवर दिसतो. या मेसेजला तुम्हाला रिप्लाय करायचा असेल तर तुम्हाला तो उघडण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मोबाइल डिस्प्लेवरच तुम्हाला रीड आणि रिप्लाय असे दोन पर्याय उपलब्ध होतात. त्यामुळे तुमचे काम आणखी सोपे होणार आहे.

नुकतेच व्हॉटसअॅपने आणखी एक फिचर युजर्सच्या भेटीला आणले होते. या नव्या फिचरमुळे तुम्ही एकाचवेळी अनेक जण व्हिडीयो कॉलिंगवर संवाद साधू शकता. फेसबुकच्या वार्षिक कॉन्फरन्समध्ये कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी याबाबतची घोषणा केली. याचबरोबर फेसबुकमध्येही काही बदल करण्यात आल्याचं झुकेरबर्ग यांनी सांगितलं होतं. व्हाट्सअॅपचे सह-संस्थापक जेन कॉम यांनी फेसबुकला सोडचिठ्ठी दिली. कॉम यांनी २०१४ मध्ये व्हॉट्सअॅप फेसबुकला विकले होते. विशेष म्हणजे त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून आपला हा निर्णय कळवला. आपल्याला स्वत:साठी काही वेळ द्यायचा आहे, त्यासाठी आपण हे पद सोडत आहोत असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते.