तेलुगु देसम पक्षाचे राज्यसभेचे खासदार सी. एम रमेश यांचे अकाऊंट व्हॉट्सअॅपकडून एकाएकी बंद करण्यात आले आहे. ही कार्यवाही थेट कंपनीकडून झाली असल्याचे रमेश यांनी म्हटले आहे. माझ्या व्हॉट्सअॅप अकाऊंटवर मला कोणाचाही मेसेज येत नाही आणि माझ्याकडूनही कोणताच मेसेज जात नसल्याचे त्यांनी सांगितले. इतक्या मोठ्या कंपनीकडून अशाप्रकारे लोकप्रतिनिधी असलेल्या एका खासदाराचे अकाऊंट बंद केले जात असेल तर सर्वसामान्य व्यक्तीबाबत तर असे सहज घडू शकते. अशाचप्रकारे तुमचेही अकाऊंट बॅन केले जाऊ शकते. आता तुमचे अकाऊंट नेमक्या कोणत्या कारणामुळे बॅन होण्याची शक्यता आहे याविषयी…

१. भडकावणारे, अश्लील किंवा कोणाचा अपमान करणारे मेसेज पाठवल्यास अकाऊंट ब्लॉक केले जाऊ शकते.

२. एखाद्या गुन्ह्याला पाठिंबा देणारे मेसेज पाठवल्यास अकाऊंट ब्लॉक होऊ शकते.

३. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या नावाने अकाऊंट बनवले आणि ते वापरले तरीही तुमचे अकाऊंट बॅन करण्याची शक्यता आहे.

४. अनोळखी व्यक्तीला सतत मेसेज करत राहिल्यासही बॅन करण्याची कारवाई केली जाऊ शकते.

५. व्हॉटसअॅपचे सर्व्हर हॅक करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा दुसऱ्या एखाद्या युजरवर नजर ठेवल्यास तुमचे अकाऊंट बॅन होऊ शकते.

६. व्हॉटसअॅपच्या कोडींगमध्ये बदल किंवा छेडछाड केल्यास तुमचे अकाऊंट बॅन होऊ शकते.

७. युजरच्या फोनमध्ये व्हायरस जाईल अशी लिंक पाठविल्यास लिंक पाठवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई म्हणून तुमचे अकाऊंट बंद केले जाऊ शकते.

८. विशिष्ट धर्म किंवा धार्मिक स्थळाविषयी द्वेष पसरेल अशी माहिती पसरवल्यास त्या व्यक्तीचे अकाऊंट बंद करण्यात येऊ शकते.

९. तुमच्या विरोधात व्हॉटसअॅपकडे अधिक तक्रारी केल्या गेल्या असतील तरही तुमचे अकाऊंट बंद केले जाऊ शकते.

१०. व्हॉटसअॅप प्लससारखी थर्ड पार्टी अॅप्लिकेशन्स वापरल्यास तुमचे मूळ अकाऊंट कंपनीकडून बंद करण्याची शक्यता नाकारता येत नाही.