व्हॉट्सअॅपचे बहुप्रतिक्षित असे ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे फीचर अधिकृतरित्या अँड्राईड, आयफोन, विंडोज फोन आणि डेक्सटॉपसाठी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे चुकून पाठवलेले मेसेजेस फक्त सात मिनिटांच्या अवधीत रिकॉल करता येणार आहे. गेल्या आठवड्यात या फीचरची घोषणा व्हॉट्सअॅपनं केली होती. हे फीचर आता अधिकृतरित्या प्रत्येक व्हॉट्सअॅप युजरसाठी उपलब्ध झाले आहे. या फीचरमुळे युजर्स जरी खुश असले तरी एक अडचण मात्र आहे.

मेसेज केल्यानंतर समोरच्या व्यक्तीनं तो पाहिला नसेल तर युजरला सात मिनिटांच्या आता तो रिकॉल करता येणार आहे. यासाठी चुकून पाठवलेल्या मेसेजवर टॅप केल्यानंतर डिलिटचा पर्याय उपलब्ध होईल. त्यात तीन पर्याय दिले जातील. ‘डिलीट फॉर मी’, ‘कॅन्सल’ आणि ‘डिलिटी फॉर एव्हरीवन’. यातील डिलिट फॉर एव्हरीवन पर्यायावर निवडल्यावर तुम्हाला मेसेज रिकॉल करता येतील, त्यामुळे तुम्ही काय पाठवलं हे जरी युजरला समजलं नसलं तरी तुम्ही काहीतरी डिलीट केलंय हे मात्र त्याच्यापासून लपून राहणार नाही.

डिलिट केलेल्या मेसेजचं नोटिफिकेशन त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. ‘संबधीत व्यक्तीनं तुम्हाला मेसेज केला पण तो डिलिट करण्यात आला आहे’ अशा प्रकारचे नोटीफिकेशन त्या व्यक्तीपर्यंत पोहचतं, त्यामुळे या फीचरमुळे युजर थोडे नाराज आहेत. गेल्यावर्षभरापासून व्हॉट्सअॅप या फीचरवर काम करत आहे, यामुळे केवळ मेसेजच नव्हे तर फोटो, डॉक्युमेंट, व्हिडिओ, जीआयएफ देखील रिकॉल करता येणार आहे.