News Flash

WhatsApp वर हॅकर्सचा हल्ला, तातडीने अपडेट करण्याची सूचना

व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून गेल्या महिन्याभरात ज्यांनी व्हॉइस कॉल केले त्यांच्या मोबाइलमध्ये...

जगभरात इंस्टंट मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापर होणाऱ्या व्हॉट्स अॅपवर हॅकर्सकडून हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. व्हॉट्स अॅपवर इस्त्रायली स्पायवेअरचा हल्ला झाला आहे. याला व्हॉट्स अॅपने देखील दुजोरा दिला आहे. फक्त मिस कॉल दिला तरी हा स्पायवेअर फोनमध्ये जाऊ शकतो. हा हल्ला इस्त्रायलच्या संरक्षण मंत्रालयाशी संलग्न एनएसओ ग्रुपकडून (NSO Group) करण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान, अॅपमधील दोष दूर करण्यात आला आहे पण तरीही युजर्सनी आपलं अॅप तातडीने अपडेट करावं असं आवाहन कंपनीकडून करण्यात आलं आहे.

या महिन्याच्या सुरुवातील व्हॉटसअ‍ॅपमध्ये स्पायवेअर असल्याचे उघड झाले होते, त्याच्या माध्यमातून सायबर हल्लेखोर हे मोबाइल फोनमधील संकेतावली उलगडून गैरवापर करू शकत होते. त्यामुळे मोबाइलमध्ये बिघाडाचा धोका होता. त्याचे निराकरण करण्यासाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. हल्लेखोराचे नाव न घेता व्हॉटसअ‍ॅपने म्हटले आहे की, सरकारच्या वतीने काम करणाऱ्या एका खासगी कंपनीने हे कृत्य केल्याचे संकेत त्यातून मिळाले आहेत. यात स्पायवेअर सोडून मोबाइल फोनच्या संचालन प्रणालीचा कब्जा घेतला जातो. व्हॉटसअ‍ॅपने इमेल निवेदनात म्हटले आहे की, वापरकर्त्यांनी व्हॉटसअ‍ॅपची सुधारित आवृत्ती डाऊनलोड करावी, त्यामुळे मोबाइलमधील माहिती दुसऱ्यांच्या हातात जाण्यापासून संरक्षण होईल. आमच्या वापरकर्त्यांना फटका बसू नये यासाठी आम्ही उद्योग भागीदारांकडे याबाबत सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी संपर्क साधला आहे. असं फेसबुकच्या मालकीच्या असलेल्या व्हॉटसअ‍ॅपने म्हटले आहे.

इस्रायलच्या एनएसओ ग्रुप या सायबर गुप्तचर कंपनीने हे स्पायवेअर तयार केले होते. व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून ज्यांनी व्हॉइस कॉल केले त्यांच्यात या कॉलला उत्तर दिले गेले असो वा नसो त्यांच्या मोबाइलमध्ये स्पायवेअर गेल्याची शक्यता असू शकते.

‘व्हॉटसअ‍ॅपमध्ये स्पायवेअरच्या माध्यमातून बिघाड करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पण व्हॉइस कॉलिंगच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेला हा स्पायवेअर दोष दूर करण्यात आला आहे, असे असले तरी सर्व व्हॉटसअ‍ॅप वापरकर्त्यांनी हे उपयोजन सुधारित म्हणजे अपडेट करून घ्यावे’ असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे.

व्हॉटसअ‍ॅपची संदेशवहन सेवा ही सांकेतिक गुप्ततेने संरक्षित असून या स्पायवेअरचा फटका नेमका किती लोकांना बसला हे सांगण्यात आलेले नाही. भारतात २०० दशलक्ष लोक व्हॉटसअ‍ॅपचा वापर करतात. कंपनीने म्हटले आहे की, आम्ही याप्रकरणाची चौकशी सुरू केली असून अमेरिकी कायदा अंमलबजावणी संस्थांनाही चौकशीसाठी पूरक माहिती दिली आहे.

एनएसओ ही इस्रायलमधील सायबर आर्म डीलर कंपनी आहे. त्यांचे पिगॅसस हे सॉफ्टवेअर लक्ष्य केलेल्या मोबाइलमधून माहिती गोळा करू शकतं. हे सॉफ्टवेअर मायक्रोफोन आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून फोनमधील माहिती मिळवू शकतं. तसंच फोनचे ठिकाणही शोधून काढू शकतं.

एनएसओचे तंत्रज्ञान हे काही अधिकृत सरकारी संस्थांना गुन्हेगारी आणि कट्टरवादी कारवायांविरोधात लढण्यासाठी देण्यात आले आहे. कंपनी स्वत:हून कोणतीही प्रणाली चालवत नाही.

एनएसओ कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेला लक्ष्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करीत नाही किंवा करू शकत नाही असे या कंपनीचे म्हणणे आहे, कार्यकर्ते व पत्रकार यांना लक्ष्य करण्यासाठी त्याचा वापर करण्यात येत असल्याचे समजते.

व्हॉट्सअप अपडेट कसे करावे –

* गुगल प्ले स्टोअर ओपन करा.

* स्क्रीनवर डाव्या दिशेला वर असलेल्या मेनूवर क्लिक करा.

* माय अ‍ॅप्स अँड गेम्स ओपन करा.

* व्हॉट्सअ‍ॅप गेल्या काही दिवसांमध्ये आपोआप अपडेट झालं असेल तर अपडेट नावाचे बटण दिसेल. नवीन आवृत्तीसाठी अपडेटवर क्लिक करा.

* व्हॉट्सअ‍ॅपचं सध्या २.१९.१३४ हे लेटेस्ट व्हर्जन कार्यरत आहे.

आयओएससाठी अ‍ॅप स्टोअर उघडा

* स्क्रीनच्या तळाशी अपडेटवर क्लिक करा

* व्हॉट्सअ‍ॅप गेल्या काही दिवसात अपडेट झालं असेल तर अ‍ॅप्सच्या यादीत ते दिसेल. ओपन असं बटनही दिसेल. व्हॉट्सअ‍ॅप आपोआप अपडेट झालं नसेल तर अपडेट नावाचं बटण दिसेल

* आयओएसवर सध्या व्हॉट्सअ‍ॅपचं २.१९.५१ हे व्हर्जन कार्यरत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 11:16 am

Web Title: whatsapp discovers targeted surveillance attack
Next Stories
1 प्रतीक्षा संपली ! OnePlus7 आणि OnePlus7 Pro भारतात लाँच
2 शाओमीने आणली ‘ही’ भन्नाट कल्पना
3 ‘हीरो’ची नवी स्कुटर, Pleasure Plus 110 भारतात लाँच
Just Now!
X