जगातील सर्वाधिक लोकप्रीय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी अनेक नवे फिचर्स आणले आहेत. मंगळवारी कंपनीने नव्या फिचर्सची घोषणा केली. या नव्या फिचर्समुळे चॅटिंगचा अनुभव विशेषतः ग्रुप चॅटिंगचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. व्हॉट्सअॅपचं लेटेस्ट व्हर्जन वापरणारे अॅन्ड्रॉइड आणि आयफोन युजर्स या नव्या फिचर्सचा वापर करु शकतात. बीटा व्हर्जन वापरणारे युजर्स आधीपासूनच या फिचर्सचा वापर करत आहेत. यामध्ये ग्रुप डिस्क्रिप्शन, अॅडमिन कंट्रोल, ग्रुप कॅच अप, पार्टिसिपेंट सर्च आणि अॅडमिन परमिशन्स या फिचर्सचा समावेश आहे.

कसे काम करतात हे फिचर्स –
– आता नवा व्हॉट्सअॅप ग्रुप बनवताना ग्रुपबद्दल माहिती देण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये ग्रुप कशासाठी बनवला, गाइडलाइन, टॉपिक इत्यादी माहिती देता येईल. त्यामुळे जेव्हा नवा युजर ग्रुपमध्ये अॅड होईल त्यावेळी त्याला डिस्क्रिप्शन सर्वात आधी दिसेल.
– नव्या फिचर्समध्ये ग्रुप अॅडमिनला वाढीव अधिकार देण्यात आले आहेत. याद्वारे ग्रुपचा सब्जेक्ट, आयकॉन आणि डिस्क्रिप्शन कोणी बदलायचं किंवा नाही हे ठरवायचा अधिकार आता अॅडमिनला असणार आहे. ग्रुप सेटिंग्सच्या आतमध्ये हे फिचर देण्यात आलं आहे.
– ग्रुप कॅच अप फिचरद्वारे ग्रुपमध्ये तुमच्यासाठी पाठवलेले मेसेज जे तुम्ही वाचलेले नसतील ते पटकन भेटतील, हे मेसेज शोधायला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. त्यासाठी उजव्या बाजूला असलेल्या @ या नव्या बटनावर टॅप करावं लागेल. त्यानंतर तुमच्यासाठी असलेले मेसेज आपोआप समोर येतील.
– ग्रुप इन्फोवर जाऊन आता ग्रुपमधील सदस्यांना शोधणं सोपं झालं आहे, त्यासाठी तेथे सर्च ऑप्शन देण्यात आलं आहे.
– ग्रुपमधील इतर सदस्यांना देण्यात आलेल्या admin permissions काढून घेण्याचा अधिकार आता अॅडमिनकडे असणार आहे. तसंच ज्याने ग्रुप बनवला असेल त्याला आता ग्रुपमधून काढता येणार नाही. महत्वाचं फिचर म्हणजे, अनेकदा इच्छा नसतानाही आपल्याला नको त्या ग्रुपमध्ये अॅड केलं जातं. ग्रुप सोडल्यावर सातत्याने त्याच ग्रुपमध्ये अॅड केलं जातं. पण आता प्रोटेक्शन फिचरचा वापर करुन एकदा सोडलेल्या ग्रुपमध्ये सातत्याने त्या सदस्याला अॅड करता येणार नाही.