फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांच्याच मालकिचं असलेल्या व फेसबुकपेक्षा जास्त लोकप्रिय होत असलेल्या व्हॉट्स अॅपबाबत चिंता व्यक्त केली आहे. व्हॉट्स अॅपची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे, हे त्यांनी मान्य केलं पण त्यातून म्हणावं तसं आर्थिक उत्पन्न किंवा कमाई होत नाही. याशिवाय व्हॉट्स अॅपवर युजर्स जास्त वेळ घालवत असल्यामुळे फेसबुकवरील इतर सोशल अॅप वापरण्याचं म्हणजेच त्यावर वेळ घालवण्याचं प्रमाणही कमी होऊ शकतं ही भीती त्यांनी व्यक्त केली. युजर्स फेसबुकवर जितका जास्त काळ घालवतात, तितकं कंपनीचं उत्पन्न वाढतं, त्यामुळे त्यांनी वेळ कमी फेसबुक वापरलं तर त्याचा थेट परिणाम उत्पन्नावर होऊ शकतो अशी भीती झुकरबर्ग यांनी व्यक्त केली. कॉन्फरन्स कॉलद्वारे बंगळुरूसह जगातील या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी झुकरबर्ग यांनी संवाद साधला.

“कायदा आणि प्रशासन कमकुवत असलेल्या देशांमध्ये आम्ही संवेदनशील डेटा ठेवू शकत नाही. कारण डेटा लोकलाइजेशन म्हणजे एक जोखीम आहे. जर या श्रेणीत मोडणाऱ्या मोठ्या देशांनी फेसबुक ब्लॉक केलं तर आमच्या उद्योगावर विपरीत परिणाम होईल,” असं मत झुकरबर्ग यांनी डेटा सुरक्षेच्या बाबतीत व्यक्त केलं. मात्र, यावेळी बोलताना झुकेरबर्ग यांनी भारत अथवा अन्य कोणत्याही देशाचा संदर्भ दिला नाही.

व्हॉट्स अॅप सारखे खासगी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक किंवा इंस्टाग्रामसारख्या तुलनेने पब्लिक किंवा सार्वजनिक झालेल्या प्लॅटफॉर्मची जागा घेऊ शकतात का?, असं मला वारंवार विचारलं जातं असं झुकेरबर्ग म्हणाले. याबाबत बोलताना, “भारतासारख्या देशात जेथे व्हॉट्स अॅप सर्वाधिक लोकप्रिय आहे तिथं असं पाहण्यात आलंय की लोक सर्वाधिक वेळ व्हॉट्स अॅपवरच घालवतात, त्यामुळे इतर अॅप्स वापरण्याचं प्रमाण कमी झालं आहे,” असा दाखला त्यांनी दिला. याचबरोबर युजर्सना प्रायव्हेट आणि पब्लिक दोन्ही प्लॅटफॉर्मवर वेळ घालवायला आवडतं आणि अशाप्रकारचा पॅटर्न जगभरामधल्या विविध पाहण्यांमध्ये आढळल्याचं त्यांनी सांगितलं. पण व्हॉट्स अॅप ताब्यात घेऊन पाच वर्षे होऊनही अद्याप हा प्लॅटफॉर्म नफ्यात आला नसल्याचंही त्यांनी मान्य केलं. एवढंच नाही तर नफ्यात नसलेलं व्हॉट्स अॅप नफ्यात असलेल्या फेसबुकवर विपरीत परिणाम करू शकतं अशी भीती त्यांनी व्यक्त केली.