लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशाच वेळी सोशल मीडिया प्रचारासाठी आणखी सक्रिय झाला आहे. या सोशल मीडिया माध्यमात व्हॉट्स अॅप हे सर्वात जास्त लोकप्रिय आणि जास्त वापरले जाणारे प्लॅटफॉर्म आहे. परंतु व्हॉट्स अॅपवर प्रचारासाठी पाठवले जाणारे मेसेज हे खरे आहेत की नाही हा मोठा प्रश्न वाचकांसमोर उभा असतो. आता व्हॉट्स अॅपने फॅक्ट चेक सेवा सुरु केली आहे. या सेवेद्वारे व्हॉट्स अॅपवर पाठवले जाणारे मेसेज, व्हिडिओ किंवा फोटो खरे आहेत की खोटे याची पडताळणी केली जाणार आहे.

या सेवेला ‘Checkpoint Tipline’ असे नाव देण्यात आले आहे. या सेवेद्वारे युजरला मेसेज खरा आहे की खोटा हे पडताळता येणार आहे. या सेवेचा वापर करण्यासाठी युजरला त्या मेसेजची लिंक चेकपॉइंटमध्ये टाकावी लागणार आहे. या टाकलेल्या लिंकची व्हॉट्स अॅपद्वारे पडताळणी होणार आहे. त्यानंतर तो मेसेज खरा आहे की खोटा याबाबत युजरला माहिती देण्यात येणार आहे. चेकपॉइंट टिपलाइन ही सेवा हिंदी, बंगाली, मल्याळम आणि तेलुगू भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. या सेवेसाठी इंटरनॅशनल सेंटर फॉर जर्नलिस्ट्स आणि असोसिएट मीडिया स्टार्टअप PROTOसोबत पार्टनरशीप करण्यात आली आहे.

कसे काम करते चेकपॉइंट?

व्हॉट्स अॅपवर मेसेजिंग सर्व्हिस इन्स्क्रिप्टेड असते त्यामुळे कोणतीही थर्ड पार्टी व्हॉट्स अॅपचे मेसेज वाचू शकत नाही. जर युजरला एखादा मेसेज खरा आहे की खोटा आहे याची पडताळणी करावयाची असल्यास टिपलाइन सर्व्हिस एखादी थर्ड पार्टी नव्हे तर रिसिव्हर म्हणून काम करणार आहे.

या नंबरवर होणार मेसेजची पडताळणी

भारतीय युजर एखाद्या फेक मेसेजची पडताळणी करण्यासाठी चेकपॉइंट टिपलाइन (+९१-९६४३०००८८८) वर पाठवू शकतात. एकदा युजरने मेसेज पाठवल्यास प्रोटो त्याची पडताळणी करुन तो फेक आहे की नाही याची माहिती युजरला देणार आहे.