फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपच्या WhatsApp Pay या सेवेची भारतात दोन वर्षांपासून प्रतीक्षा आहे. WhatsApp ने भारतात दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2018 मध्ये या पेमेंट सेवेला बिटा टेस्टिंगच्या रुपात जारी केले, तेव्हापासून चर्चेत असलेल्या या सेवेला अद्यापही सुरूवात झालेली नाही. मात्र, आता ही सेवा लवकरच सुरू होणार आहे.

मे महिन्याच्या अखेरपर्यंत WhatsApp Pay ही सेवा भारतात सुरू होईल असं समजतंय. Money Control च्या वृत्तानुसार, मे महिन्याच्या अखेरपर्यंत कंपनी WhatsApp Pay ही सेवा अधिकृतपणे लॉन्च करेल. पहिल्या टप्प्यामध्ये आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक या WhatsApp Pay सेवेचा हिस्सा असतील. एसबीआय मात्र पहिल्या टप्प्यात यामध्ये सहभागी नसेल, पण नंतरच्या टप्प्यामध्ये मात्र एसबीआयचाही समावेश केला जाईल.

“व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आमच्या सर्व ग्राहकांना पैशांची देवाण-घेवाण करता यावी याबाबत आमची सरकारसोबत चर्चा सुरू आहे. WhatsApp Pay मुळे डिजिटल व्यवहार करण्यास चालना मिळेल आणि करोनाच्या संकटकाळात हे महत्त्वाचं आहे. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पेमेंट हा भारतातील 400 मिलियन युजर्ससाठी करोना संकटकाळात सर्वात सुरक्षित मार्ग आहे”, अशी माहिती मनीकंट्रोलशी बोलताना व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्यांनी दिली. WhatsApp ने 2018 मध्ये या पेमेंट सेवेला बिटा टेस्टिंगच्या रुपात जवळपास 10 लाख युजर्ससाठी जारी केले होते. त्यानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या सेवेला राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडूनही परवाना मिळाला. त्यामुळे आता ही सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या सेवेमुळे युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपद्वारेच पैशांचा व्यवहार करता येईल. भारतात कोट्यवधी लोक व्हॉट्सअ‍ॅप वापरत असल्याने ही सेवा सुरू झाल्यानंतर ती भारतातील सर्वात मोठी मोबाइल पेमेंट सेवा ठरू शकते.