अँड्रॉइड मोबाइलधारकांसाठी Whatsapp लवकरच नवं फीचर घेऊन येत आहे. ‘फिंगरप्रिंट लॉक’नावाचं हे फीचर आहे. याची चाचणीही पूर्ण झाली असून लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये हे फीचर उपलब्ध देखील झाल्याचं वृत्त आहे. या फिचरमुळं तुमची चॅटिंग (संभाषण) आणखी सुरक्षित होणार आहे. व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांच्या फिंगरप्रिंटशिवाय इतर कोणालाही व्हॉट्सअॅप उघडता येणार नाही.

WaBetaInfo च्या वृत्तानुसार हे फीचर आता अँड्रॉइड बीटा युजर्सच्या अॅप व्हर्जन 2.19.221 मध्ये उपलब्ध झालंय. व्हॉट्सअॅपने आयओएस (iOS) वापरकर्त्यांसाठी हे फीचर तीन महिन्यांपूर्वीच उपलब्ध करुन दिले आहे. अँड्रॉइड मोबाइलधारकांसाठी आठ महिन्यांपासून या फीचरवर कंपनीकडून चाचणी सुरू होती. जर तुमच्याकडे योग्य व्हर्जन असेल तर Whatsapp च्या सेटिंगमध्ये जाऊन अकाउंट पर्याय निवडा, त्यानंतर प्रायव्हसी पर्यायावर क्लिक केल्यास तुम्हाला हे फीचर अॅक्टिव्ह करता येईल.

कसं काम करणार हे फीचर –
हे फिचर व्हॉट्सअॅपवरील चॅटिंग आणखी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने आणण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. कंपनीकडून व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येतो. पण, आपला मोबाइल फोन अनेकदा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या हातात पडला तर आपले व्हॉट्सअॅप मेसेजेस वाचले जाण्याची भीती अनेकांना असते. आता फिंगरप्रिंट लॉक या फिचरमुळे परवानगीशिवाय व्हॉट्सअॅप उघडता येणार नाही. मोबाइल फोनमधील फिंगरप्रिंट सेन्सरचा यासाठी उपयोग होण्याची शक्यता आहे. Whatsapp कडे ऑथेंटिकेशनसाठी तुमच्या फिंगरप्रिंट डाटाचा अॅक्सेस नसेल हे देखील स्पष्ट करण्यात आलंय. पण WaBetaInfo च्या वृत्तानुसार लॉक असतानाही नोटिफिकेशन्सद्वारे रिप्लाय किंवा कॉल रिसिव्ह करता येईल. या फीचरमध्ये ऑटोमॅटिकली लॉकसाठी तीन पर्याय असणार आहेत. यातील पहिला पर्याय म्हणजे तातडीने लॉक करण्याचा, दुसरा पर्याय एक मिनिटानंतर आणि तिसरा पर्याय 30 मिनिटांनंतर लॉकचा असेल.