तुम्ही तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप इन्स्टॉल केलं असेल तर जरा या बातमीकडे विशेष लक्ष द्या. व्हॉट्सअ‍ॅपच्या २.१९.३६० या व्हर्जनमध्ये एक त्रुटी आहे. या त्रुटीमुळे तुमच्या मोबाइलमधील कॅमेराच्या माध्यमातून होणारी प्रत्येक अ‍ॅक्टीव्हीटीचा डेटा लीक होत आहे. यामध्ये तुमचे खासगी फोटो, व्हिडिओ यासारख्या संवेदनशील माहितीचा समावेश आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातील भारतामधील प्रतिष्ठीत १४०० वापरकर्त्यांच्या माहितीचे हॅकिंग ज्या पद्धतीने करण्यात आले त्याच पद्धतीने ही माहिती चोरली जात असण्याचे वृत्त समोर आले होते. धक्कादायक बाब म्हणजे ही चोरी ज्या ‘पिगॅसस’ हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून होते ते इस्त्रायलमधील सॉफ्टवेअर केवळ सरकारी संस्थाना विकले जाते. त्यामुळेच अप्रत्यक्षपणे अशाप्रकारे भारतामधील व्हॉट्सअ‍ॅप युझरच्या प्रत्येक हालचालीवर केंद्र सरकार नजर ठेऊन आहे का असा सवालही उपस्थित केला जाऊ लागला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपपची मालक कंपनी असणाऱ्या फेसबुकला मागील वर्षीच मे महिन्यामध्ये अशाप्रकारे अ‍ॅपमध्ये घातक बग अढळून आला होता. या बगमुळे फोन कॉलच्या माध्यमातून युझरची माहिती लीक केली जात होती. मात्र सध्या व्हॉट्सअ‍ॅपमधील बगमुळे कोणतीही अॅक्टीव्हीटी न करताही युझरचा खासगी डेटा जाहिरातदार कंपन्यांना पाठवला जात आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर इस्त्रायली स्पायवेअरचा हल्ला झाल्याच्या वृत्ताला व्हॉट्सअ‍ॅपने मे महिन्यामध्ये दुजोरा दिला आहे. फक्त मिस कॉल दिला तरी हा स्पायवेअर फोनमध्ये जाऊ शकतो. हा हल्ला इस्त्रायलच्या संरक्षण मंत्रालयाशी संलग्न एनएसओ ग्रुपकडून (NSO Group) करण्यात आल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. व्हॉट्सअ‍ॅपने इमेलद्वारे जारी केलेल्या निवेदनामध्ये अ‍ॅपमधील दोष दूर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता नवीन व्हर्जनमध्ये पुन्हा एकदा असाच एखादा बग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अ‍ॅपच्या सेटींगमधील Security पर्यायाअंतर्गत तुमच्या मोबाईलचा कॅमेरा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून वापरला जात आहे असे नोटीफिकेशन युझर्सला वारंवार दाखवले जाते. मात्र हा पर्याय ऑफ केला तरी पुन्हा आपोआप तो सुरु होतो. त्यामुळेच या माध्यमातून युझर्सचे सर्व खासगी फोटो, व्हिडिओ आणि कॅमेरातून होणाऱ्या इतर अ‍ॅक्टीव्हीटीसंदर्भातील डेटा लीक होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दोन महिन्यापूर्वी यावरुन देशात झाला होता भूकंप

इस्रायली कंपनीचे तंत्रज्ञान वापरून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे भारतातील पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांसह जगभरातील शेकडो जणांवर पाळत ठेवण्यात आल्याच्या धक्कादायक प्रकार ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी उघडकीस आला होता. ‘एनएसओ’ या इस्रायली कंपनीच्या पेगॅसस सॉफ्टवेअरने भारतातील पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्त्यांसह शेकडो जणांच्या स्मार्टफोनमध्ये घुसखोरी केल्याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपने अमेरिकेतील न्यायालयात दिली होती. इस्रायली तंत्रज्ञानाद्वारे व्हॉट्सअ‍ॅपमार्फत संदेश, संभाषण ऐकणे आदींद्वारे संबंधित मोबाइलधारकावर पाळत ठेवण्यात येत असल्याचे उघडकीस आले होते. मात्र, पत्रकार किंवा मानवाधिकार कार्यकर्त्यांविरोधात वापरण्यासाठी नव्हे तर दहशतवादाविरोधात आणि देशांच्या सुरक्षेसाठी सरकारांना हे तंत्रज्ञान वापराची परवानगी देण्यात येते, असा दावा ‘एनएसओ’ कंपनीने केला होता.

मे महिन्यात काय झालं होतं?

मे महिन्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर हॅकर्सकडून हल्ला झाल्याचं कंपनीने मान्य केलं होतं. इस्रायलच्या एनएसओ ग्रुप या सायबर गुप्तचर कंपनीने व्हॉट्सअ‍ॅपवर हल्ला करणारे स्पायवेअर तयार केले होते. व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून ज्यांनी व्हॉइस कॉल केले त्यांच्यात या कॉलला उत्तर दिले गेले असो वा नसो त्यांच्या मोबाइलमध्ये स्पायवेअर गेल्याची शक्यता त्यावेळी सायबर सुरक्षातज्ज्ञांनी व्यक्त केली होती. एनएसओ ही इस्रायलमधील सायबर आर्म डीलर कंपनी आहे. त्यांचे ‘पिगॅसस’ हे सॉफ्टवेअर लक्ष्य केलेल्या मोबाइलमधून माहिती गोळा करू शकतं. हे सॉफ्टवेअर मायक्रोफोन आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून फोनमधील माहिती मिळवू शकतं. तसंच फोनचे ठिकाणही शोधून काढू शकतं. एनएसओचे तंत्रज्ञान हे काही अधिकृत सरकारी संस्थांना गुन्हेगारी आणि कट्टरवादी कारवायांविरोधात लढण्यासाठी देण्यात आले आहे. कंपनी स्वत:हून कोणतीही प्रणाली चालवत नाही. एनएसओ कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेला लक्ष्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करीत नाही किंवा करू शकत नाही असे या कंपनीचे म्हणणे आहे, कार्यकर्ते व पत्रकार यांना लक्ष्य करण्यासाठी त्याचा वापर करण्यात येत असल्याचे समजते. मे महिन्याच्या सुरुवातील व्हॉट्सअ‍ॅपमध्ये स्पायवेअर असल्याचे उघड झाले होते, त्याच्या माध्यमातून सायबर हल्लेखोर हे मोबाइल फोनमधील संकेतावली उलगडून गैरवापर करू शकत होते. त्यामुळे मोबाइलमध्ये बिघाडाचा धोका होता. त्याचे निराकरण करण्यासाठी अनेक बदल करण्यात आले आहेत. हल्लेखोराचे नाव न घेता व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की, सरकारच्या वतीने काम करणाऱ्या एका खासगी कंपनीने हे कृत्य केल्याचे संकेत त्यातून मिळाले होते. यात स्पायवेअर सोडून मोबाइल फोनच्या संचालन प्रणालीचा कब्जा घेतला जातो. व्हॉट्सअ‍ॅपने इमेल निवेदनात “वापरकर्त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपची सुधारित आवृत्ती डाऊनलोड करावी, त्यामुळे मोबाइलमधील माहिती दुसऱ्यांच्या हातात जाण्यापासून संरक्षण होईल. आमच्या वापरकर्त्यांना फटका बसू नये यासाठी आम्ही उद्योग भागीदारांकडे याबाबत सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी संपर्क साधला आहे,” असं म्हटलं होतं.

सध्या भारतीय व्हॉट्सअ‍ॅप युझर्सला जो कॅमेरासंदर्भातील पर्याय आपोआप ऑन झालेला दिसतो तो अशाच प्रकारच्या हेरगिरीचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.