फेसबुकचीच मालकी असलेल्या व्हॉटसअॅपने जगभरातील आपल्या युजर्सची मने जिंकली आहेत. अतिशय कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या व्हॉटसअॅपने सोशल मीडियामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपल्या युजर्सला जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी व्हॉटस अॅपकडून सातत्याने प्रयत्न सुरू असतात. नुकतेच व्हॉटसअॅपने ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ आणि ‘नोटिफिकेशन हिस्टरी’ ही नवीन फिचर्स आणली. त्यानंतर आता व्हिडिओ कॉलिंग आणि व्हॉईस कॉलिंगसाठी एक अतिशय उपयुक्त फिचर येणार आहे.

ज्यामुळे तुम्हाला व्हॉईस कॉल व्हिडिओ कॉलमध्ये स्वीच करता येईल. व्हॉट्सअॅप सध्या ‘व्हिडिओ टू व्हॉईस कॉल स्वीच’ या फिचरवर काम करत आहे. या फिचरमुळे व्हॉईस कॉलवर बोलत असतानाच कॉल कट न करता व्हिडिओ कॉलमध्ये तो स्वीच करता येईल. तर व्हिडिओ कॉल व्हॉईस कॉलमध्ये बदलता येईल. मात्र, यासाठी तुम्हाला समोरच्या व्यक्तीची परवानगी लागेल. विशेष म्हणजे या फीचरसोबतच कॉल रेकॉर्डिंग फीचरही देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. ग्लोबलायझेशनमुळे जग जवळ येत असताना इंटरनेटचा वापर करुन कॉलिंग करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंगचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून व्हॉटसअॅप युजर्सना या नवीन फिचरबाबत उत्सुकता होती.