सोशल मीडिया सध्या अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. अशातच बुधवारी(दि.3) जगभरातील अनेक भागांमध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम, WhatsApp हे तिनही सर्वाधिक लोकप्रिय अॅप डाऊन झाल्याचं पहायला मिळालं. सध्या हे अॅप सुरळीत कार्यरत आहेत, पण हे अॅप्स डाऊन झाल्यानंतर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

‘केंद्र सरकारच्या आदेशानुसार रात्री 11.30 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत WhatsApp चा वापर करता येणार नाही, कारण ही सेवा रात्रीच्या वेळेत बंद असेल. हा मेसेज 10 जणांना फॉरवर्ड न केल्यास 48 तासांमध्ये व्हॉट्सअॅप अकाउंट देखील बंद होईल, त्यानंतर पुन्हा अकाउंट सुरू करण्यासाठी 499 रुपयांचा भरणा करावा लागेल’, असा एक मेसेज सध्या व्हॉट्सॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जाणून घेऊया सत्य –
दूरसंचार , माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून अशाप्रकारची कोणतीही नोटीस पाठवण्यात आलेली नाही. याशिवाय कोणत्याही सोशल मीडिया कंपनीने अशाप्रकारचा अधिकृत मेसेज पाठवलेला नाहीये. व्हॉट्सअॅप किंवा व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या फेसबुकनेही असा बदल करण्याचा किंवा नवे नियम लागू करण्याची घोषणा केलेली नाही. परिणामी व्हायरल मेसेजमधून करण्यात आलेला दावा चुकीचा असून व्हॉट्सअॅप बंद होईल अशी चिंता करण्याची गरज नाही. बुधवारी फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सअॅप सेवा डाऊन झाल्याने संधीचा फायदा उचलण्यासाठी काही खोडकर युजर्सकडून जाणूनबुजून अशाप्रकारची अफवा पसरवण्यात आली आहे.