व्हॉटसअॅप हे सध्या स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या गळ्यातील ताईत झाले आहे. एखादा महत्त्वाचा निरोप देण्यापासून ते परदेशातील व्यक्तीशी संपर्क करण्यापर्यंत अनेक कामा व्हॉटसअॅपमुळे सोपी झाली आहेत. पण बाजारात चर्चेत असलेल्या जिओच्या मोबाईलमध्ये व्हॉटसअॅप नसल्याने ग्राहकांची काहीशी निराशा झाली होती. मात्र आता याच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी असून जिओच्या फोनमध्येही काही दिवसांत व्हॉटसअॅप दाखल होणार आहे. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, वर्षभरापूर्वी लाँच करण्यात आलेल्या जिओच्या ४ जी फोनमध्ये आता व्हॉटसअॅप वापरता येणार आहे.

मागच्या महिन्यातच जिओने आपल्या ४ जी फिचर फोनमध्ये फेसबुकची सुविधा दिली होती. त्यानंतर आता कंपनीने व्हॉटसअॅप लवकरच सुरु होणार असल्याचे सांगितले. जिओ फोन जवळपास मोफत असल्याने ग्राहकांनी या फोनचे बुकींग सुरु झाल्यावर त्यावर अक्षरशः उड्या मारल्या होत्या. त्यामुळे कंपनीला हे फोनबुकींग बंदही करावे लागले होते. आपल्या मोबाईलला मिळणारा प्रतिसाद बघून कंपनीने मागील काही दिवसांत फोनमध्ये वेगवेगळ्या सुविधा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे या मोबाईलला असणारी मागणी आणखी वाढेल असा कंपनीचा अंदाज आहे.

काही क्षणात जगात कुठेही संपर्क साधण्याचे उत्तम साधन म्हणून व्हॉटसअॅपकडे पाहीले जाते. आता व्हॉटसअॅपचे महिन्याला १.५ बिलीयन वापरकर्ते आहेत. यामध्ये दिवसेंदिवस भरच पडत आहे. त्यामुळे मोबाईल मार्केटमध्ये आपला टिकाव लागायचा असेल तर त्या मोबाईलमध्ये व्हॉटसअॅप असणे आवश्यक आहे. रिलायन्सने त्यादृष्टीने आपल्या फोनमध्ये बदल करत ग्राहकांना खूश केले आहे. सुरुवातीला प्रायोगिक स्तरावर ही सुविधा सुरु करण्यात येईल आणि मग टप्प्याटप्प्याने सर्व जिओ मोबाईल धारकांना ही सुविधा वापरता येईल असेही म्हटले जात आहे.