चालू वर्षाच्या अखेरिस विंडोज फोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा व्हॉट्सअॅप अन्य मोबाइल युझर्सना झटका देण्याच्या तयारीत आहे. 1 फेब्रुवारी 2020 पासून काही अँड्रॉइड आणि iPhone मध्ये व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. व्हॉट्सअॅपच्या अपडेटेड फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चनमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Android 2.3.7 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या सर्व मोबाइलमध्ये, तसेच iOS 7 वर सुरू असलेल्या iPhones वर 1 फेब्रुवारी 2020 पासून व्हॉट्सअॅप चालणे बंद होणार आहे. तसेच या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमचे मोबाइल वापरणाऱ्या युझर्सना व्हॉट्सअॅपवर अकाऊंट तयार करता येणार नाही. तसेच त्यांना आपले अकाऊंट रिवेरिफायदेखील करता येणार नाही. दरम्यान, याचा परिणाम जास्त युझर्सवर होणार नसल्याचे मत व्हॉट्सअॅपचे मालकी हक्क असलेल्या फेसबुककडून व्यक्त करण्यात आले. जुन्या मोबाइलचा वापर करणाऱ्यांवरच याचा परिणाम होणार आहे. तसेच व्हॉट्सअॅपचा वापर सुरू ठेवण्यासाठी Android 4.0.3 किंवा त्यापेक्षा नवे अँड्रॉइड व्हर्जन असलेल्या मोबाइलचा वापर करण्याचा सल्ला फेसबुकने दिला आहे.

तर iPhone च्या युझर्सने iOS8 किंवा त्यापेक्षा नव्या व्हर्जनचा फोन वापरावा. तसेच हे व्हर्जन असलेल्या iPhone वर किंवा नव्या व्हर्जनच्या iPhone वर व्हॉट्सअॅप सुरळीत चालणार असल्याचेही फेसबुकने स्पष्ट केले आहे. तसेच Kai OS 2.5.1+ वर सुरू असलेल्या मोबाइलवरही व्हॉट्सअॅप चालणार असल्याचे नव्या FAQ मध्ये सांगण्यात आले आहे. 31 डिसेंबर 2019 पासून विंडोज फोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नसल्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती.