19 January 2019

News Flash

‘पॉवर बँक’ खरेदी करताना..

आजघडीला बाजारात सर्व आकार, आकारमान आणि वापरासाठीच्या पॉवर बँक उपलब्ध आहेत.

हल्लीच्या ‘कनेक्टेड’ जगात सर्वच गॅजेट्स किंवा उपकरणांमध्ये अतिशय महत्त्वाची आहे ती पॉवर बँक. सध्याच्या दिवसांमध्ये बॅटरी तंत्रज्ञान हे आपण कुठे त्याचा वापर करतोय यापेक्षा आपण आपले डिव्हाईस किती वापरतोय, याच्याशी अधिक संबंधित आहे. पण खरे तर आपण बऱ्याचदा बॅटरी संपल्याच्या लाल निशाणापुढे अडकून पडतो. प्रत्येक वेळी मोबाइल चार्जिग करण्यासाठी विद्युत जोडणी शोधत बसावे लागते. त्यातही आपण प्रवासात असू तर मोबाइल स्वीच ऑफ होण्याखेरीज पर्याय नसतो. यातूनच पोर्टेबल पॉवर बँकची गरज निर्माण झाली.

आजघडीला बाजारात सर्व आकार, आकारमान आणि वापरासाठीच्या पॉवर बँक उपलब्ध आहेत. म्हणूनच, कोणती पॉवर बँक घ्यावी हे ठरवण्याकरिता किंमत हा तुमच्यासाठी तितकासा महत्त्वाचा मुद्दा नसला तरी कोणती पॉवर बँक चांगली हे तुम्हाला कसे कळेल? हे जाणून घेण्यासाठी पुढील मुद्दे लक्षात घ्या.

क्षमता

सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे पॉवर बँकची क्षमता. ही क्षमता एमएएचमध्ये मोजली जाते. जेवढी जास्त ‘एमएएच’ची पॉवर बँक तेवढे अधिक चांगले. स्वस्तात मिळते म्हणून कमी क्षमतेची पॉवर बँक घेतली तर बॅटरी संपली की ती चार्ज करण्यासाठीही धावाधाव करावी लागते. त्यामुळेच नेहमी जास्त क्षमतेच्या पॉवर बँकच्या खरेदीला प्राधान्य द्या. शक्यतो तुमच्या मोबाइलच्या बॅटरीक्षमतेच्या दुप्पट बॅटरी क्षमता असलेली पॉवर बँक निवडणे कधीही चांगले. यामुळे तुम्ही किमान दोन वेळा तुमचा मोबाइल पूर्णपणे चार्ज करू शकता.

आऊटपूट स्लॉट

अलीकडे बरेच जण दोन मोबाइल वापरतात. तर प्रवासात लॅपटॉप किंवा टॅब्लेट वापरणाऱ्यांनाही ‘पोर्टेबल चार्जिग’ची गरज पडते. त्यामुळे ‘पॉवर बँक’ खरेदी करताना तिला किती ‘आऊटपूट स्लॉट’ आहेत, हेही ध्यानात घ्यायला हवे. दोन आऊटपूट स्लॉट असलेली पॉवर बँक निवडणे कधीही चांगले. त्यामुळे तुम्ही एकाच वेळी दोन उपकरणे चार्ज करू शकता. अर्थात जेवढे जास्त ‘स्लॉट’ तेवढी पॉवर बँकची किंमत वाढते, हेही लक्षात ठेवा.

सेलचा प्रकार

पॉवर बँकमध्ये कोणत्या प्रकारची बॅटरी अर्थात सेल आहे, हे पाहणेही आवश्यक आहे. लिथियम आयन किंवा लिथियम पॉलिमर अशा प्रकारचे सेल पॉवर बँकमध्ये असतात. यापैकी ‘आयन’ बॅटरी सहज उपलब्ध असते आणि तिचे दरही कमी असतात. तर पॉलिमर बॅटरी किंचित महाग असली तरी ती प्रतियुनिट वजनाच्या दुप्पट चार्ज घनता पुरवते. त्यामुळे पॉवर बँकचे वजन कमी हवे असेल तर ‘पॉलिमर’ बॅटरीचा पर्याय योग्य आहे.

स्वस्ताईचा मोह नको

हल्ली रस्त्यावरही पॉवर बँक अतिशय स्वस्त दरात मिळतात. मात्र या पॉवर बँक खात्रीशीर नसतात. त्यात दर्शवलेल्या क्षमतेपेक्षा कमी क्षमतेची बॅटरी असू शकते किंवा त्यातील ‘करंट ड्रॉ’ही सदोष असू शकतो. त्याहीपेक्षा धोकादायक म्हणजे अशा पॉवर बँकची बॅटरी जास्त चार्ज झाल्यास गरम होऊन तिचा स्फोट होण्याचीही भीती असते. त्यामुळे पॉवर बँक खरेदी करताना ती ब्रँडेड कंपनीचीच खरेदी करावी.

तापमान नियंत्रण

अधिक सुरक्षितता व परफॉर्मन्सकरिता ओव्हर व्हॉल्टेज प्रोटेक्शन (ओव्हीपी), ओव्हर चार्ज प्रोटेक्शन (ओसीपी) व ओव्हर-टेम्परेचर प्रोटेक्शन (ओटीपी) असलेली पॉवर बँक खरेदी करा. यामुळे चाìजग किंवा डिसचाìजगच्या वेळी ओव्हरहिटिंग व स्फोटापासून सुरक्षा मिळत बॅटरीच्या दीर्घायुष्याची खात्री मिळते.

(लेखक अ‍ॅम्ब्रेन इंडियाया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)

First Published on April 12, 2018 1:56 am

Web Title: when buying power bank