अगदी लहान वयापासून आपण आपल्या मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त इतरही विषयांचं शिक्षण देतो. मुलांनी अभ्याव्यतिरिक्त खेळ किंवा इतर कौशल्य अंगीकारावी यासाठी पालक प्रयत्नशील असतात. मात्र यासगळ्यात आपण मुलांना आर्थिक साक्षर करण्यात विसरतो. म्हणूनच या लेखातून मुलांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्याचं योग्य वय नेमक किती त्याबद्दल हॅप्पीनेस फॅक्टरीचे संस्थापक अमर पंडित यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत.

आपली मुलं जेव्हा वास्तव जगात प्रवेश करतील तेव्हा त्यांचा पहिला सामना पैशाशी होणार आहे हे अनेकांच्या लक्षात येत नाही. संपत्तीविषयक सल्लागार म्हणून काम करताना अत्यंत चतुर लोकही पैशाबाबत मोठ्या चुका करतात असं लक्षात येतं. मग ते बँकेतील व्यवहार असो, कर्ज घेणे असो किंवा गुंतवणूक करणं असो. माहितीचा अभाव किंवा जागरूकताच नसल्यानं ते चुका करतात. म्हणूनच पैशाचे व्यवस्थापन आपण मुलांना अगदी लहान वयापासून शिकवले पाहिजे.

यासाठी ५ ते १२ हा वयोगट उत्तम आहे. याच वयात त्यांना बचतीचे तसेच आर्थिक मुद्दयांचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे. अर्थात तुमच्या मुलाने वयाची १२ वर्षे पार केली असली, तरी त्याला हे शिक्षण दिलं पाहिजे. १२ वर्षांवरील मुलाला हे शिक्षण सुरू करण्यासाठी थोडासा उशीर झाला असतो. कारण या वयात मुलांमध्ये काही सवयी खोलवर रुजलेल्या असतात किंवा तो स्वत: ग्राहक झालेला असतो. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्यासाठी या मुलांना रोचक वाटतील अशा उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन करणं नेहमीच पालकांसाठी सोयीचं असतं.

तर पौंगंडावस्थेतील मुलं ही समवयस्कांच्या दबावामुळे किंवा बाहेरच्या वातावरणामुळे काहीशी न ऐकणारी झालेली असतात. त्यामुळे त्यांना आर्थिक जागरूकतेचे आराखडे पाळायला लावणं अशावेळी कठीण होतं. त्यांच्या आयुष्यातील या टप्प्यावर त्यांना नवीन मोबाइल फोन्स, गॅझेट्स, ब्रॅण्डेड कपडे विकत घेण्याची इच्छा असते आणि त्यांचे मित्र करतात त्या सगळ्या गोष्टी त्यांना करायच्या असतात. लहान वयापासून त्यांच्यात खर्चाच्या चांगल्या सवयी तुम्ही बिंबवल्या नसतील तर या टप्प्यावर त्यांना समजुतदारपणे व जबाबदारीनं वागण्यास सांगणं म्हणजे काहीशी जाचक सूचना वाटू शकते. म्हणूनच कमी वयापासूनच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं त्याबद्दल माहिती देणं इष्ट आहे.

मुलांना पैशाबद्दल काही शिकवण्यास बहुतेक पालक पुढाकार घेत नाहीत. पिगी बँक्स आणि बचतीच्या संकल्पनेला ते मुले अगदी छोटी असल्यापासून स्पर्श करतात पण पैसे व कौटुंबिक खर्चाच्या मुद्दयांवर मुलांसोबत चर्चा करण्यास ते तयार नसतात. विशेषत: भारतात पैसा हा फार संवेदनशील मुद्दा आहे आणि संवेदनशील मुद्दयांवर चर्चा करण्याचं प्रमाण बघता मुलांसोबत लैंगिक शिक्षणाविषयी चर्चा केली जात नाही, तशीच पैशाबाबतही चर्चा केली जात नाही. मुलांना पैशाबाबत शिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना अगदी लवकर पैसे हाताळू द्या, कारण, पैशाची शक्ती आणि त्यांच्या निर्णयांचे परिणाम त्यांना कळणे खूप गरजेचं आहे.

आर्थिक साक्षरतेबद्दल लवकर माहिती द्यायला सुरुवात केल्यास, तुम्ही मुलांना भविष्यकाळातील आर्थिक यशासाठी एक भक्कम स्पर्धात्मक आधार पुरवता आणि स्वत:च्या आर्थिक निर्णयांबाबत त्यांना जबाबदार करता. पैशाबद्दल निकोप मूल्ये जोपासणं, उद्दिष्टे व प्राधान्यक्रम निश्चित करणं, चतुर निर्णय घेणं, तातडीचा आनंद लांबवणं आणि कष्टाचं मूल्य समजून घेणं हे मुलांना आर्थिक व्यवस्थापन शिकवण्यासाठी आवश्यक असे प्रमुख मुद्दे आहेत. याशिवाय, तुम्ही मुलांना थेट काही शिकवले नाही, तरी तुमच्या प्रत्येक कृत्याचे निरीक्षण करत ती खूप काही शिकत आहे, हे कायम लक्षात ठेवा.