15 December 2018

News Flash

व्हॉटसअॅपचे व्हॉईस रेकॉर्डिंग होणारे सोपे

नव्या फिचरची चाचणी सुरु

व्हॉट्सअॅप हे भारतात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप आहे. व्हॉटसअॅप हे अॅप्लिकेशन सध्या लोकांसाठी अनिवार्य गरज बनली आहे. फोटो किंवा फाईल पाठवणं, लोकेशन शेअर करणं, फोन किंवा व्हिडिओ कॉलिंग करणं अशा अनेक गोष्टी व्हॉट्सअॅपमुळे सहज शक्य झाल्यात. याबरोबरच व्हॉईस रेकॉर्डिंगसाठीही व्हॉट्सअॅपचा चांगल्या पद्धतीने उपयोग होताना दिसतो. लोकांच्या या नवनवीन गरजा लक्षात घेऊन व्हॉटसअॅप आपल्या फिचर्समध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करत आहे. नुकतीच आणखी एक गोष्ट समाविष्ट करण्यात आली आहे. यासाठी एक नवं फिचर आणलं असून त्याद्वारे व्हॉईस रेकॉर्डिंग करणे सोपे होणार आहे.

व्हॉट्सअॅप अपडेट लॉक्ड रिकॉर्डिंग (Locked Recording) हे फिचर घेऊन येत आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स व्हॉईस रेकॉर्ड करु शकतात. यासाठी युजरला व्हॉईस मेसेज पाठवताना रेकॉर्डचे बटन दाबून ठेवावे लागते. मात्र आता नव्या अपडेटमध्ये पूर्ण रेकॉर्डींग होईपर्यंत बटन दाबून ठेवण्याची गरज नाही. एकदाच बटण प्रेस करुन रेकॉर्डींग सुरु करा आणि संपल्यावर रेकॉर्ड आयकॉनवर क्लिक केल्यास पूर्ण रेकॉर्डिंग मिळू शकेल.

या नव्या फिचरची चाचणी सुरु असून ती झाल्यानंतर हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध होईल असे सांगण्यात आले आहे. तसंच या नव्या अपडेटमुळे व्हॉईस रेकॉर्डिंग पाठविण्याआधी आपल्याला ऐकता येणार आहे. त्यामुळे त्यात काही राहीले असल्यास किंवा चुकले असल्यास नव्याने रेकॉर्ड करुन पाठविता येणार आहे. युजर्सचा वापर जास्तीत जास्त सोपा व्हावा यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी व्हॉटसअॅपने ग्रुप डिस्क्रिप्शन नावाचं नवं फिचर आणलं होतं. या फीचरमुळे ग्रुप अॅडमिन किंवा ग्रुपमध्ये असणारे इतर युजर्स ग्रुप स्थापन करण्याचा हेतू काय आहे हे लिहू शकतात. याव्यतिरिक्त ग्रुपमध्ये चर्चा करताना महत्त्वाचा मुद्दा चॅट बॉक्समध्ये सर्वात वर पीन करूनही ठेवू शकतात. याआधी आणलेल्या पेमेंट फिचरमुळे डिजिटल व्यवहार सोपे होणार असल्याचं बोललं जात होतं.

First Published on March 11, 2018 4:51 pm

Web Title: whtasapp new feature update voice recording