मोबाइल आणि कॉम्प्युटरविना आजच्या घडीला आपण जगाची कल्पनाच करु शकत नाही. या दोन्ही तंत्रज्ञानामुळे आपले आयुष्य खूप मोठ्या प्रमाणात बदलले आहे. आपण सध्या सर्रास वापरत असलेल्या मोबाइलचा पहिला कॉल आजच्या दिवशी ४५ वर्षांपूर्वी केला गेला. म्हणून मोबाइलच्या जगात ३ एप्रिल हा दिवस खूप जास्त महत्त्वाचा मानला जातो. पाहूयात काय आहेत पहिल्या कॉलबाबतच्या महत्त्वाच्या गोष्टी…

– मोटोरोला कंपनीचे संशोधक मार्टीन कूपर यांना मोबाइलचे जनक म्हणून ओळखले जाते. याचे कारण म्हणजे ३ एप्रिल १९७३ रोजी त्यांनी आपले प्रतिस्पर्धी असलेल्या बेल लॅब्सच्या डॉ. जोएल एस एंगेल यांना पहिल्यांदा मोबाइलवरुन कॉल केला होता.

– अशाप्रकारे कूपर यांनी मोबाइलवरुन कॉल करण्यात बाजी मारल्याने पहिला मोबाइल सादर करण्याच्या स्पर्धेत आपण हरलो आहोत याची जाणीव एंगेल यांना झाली होती.

– अमेरिकेत कार फोनचा वापर १९३० पासून होत असून पण हातात धरता येईल अशा फोनचा वापर ३ एप्रिल रोजी पहिल्यांदा करण्यात आला.

– पहिल्यांदा ज्या फोनवरुन फोन केला तो मोटोरोला कंपनीचा प्रोटोटाइप प्रणालीवर आधारित फोन होता. या पहिल्या कॉलला डायनाटेक असं नाव देण्यात आलं.

– या पहिल्यांदा कॉल करण्यात आलेल्या फोनचे वजन १.१ किलोग्रॅम होते. आताच्या स्मार्टफोनशी या फोनची तुलना करायची झाल्यास या फोनचा आकार विटेसारखा होता.

– मोबाइल खरेदी करताना आपण त्याची बॅटरी किती मिलीअॅम्पियर्सची आहे ते आपण पाहतो. तो फोन किती काळ चार्ज केल्यानंतर किती वेळ चालतो हेही आपण लक्षात घेतो. पण हा पहिला फोनची बॅटरी चार्ज करण्यासाठी तब्बल १० तासांचा कालावधी लागायचा.